⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

मोठी बातमी ! आता जिल्हांतर्गत प्रवासासाठी ई पासची गरज नाही, पण…

जळगाव लाईव्ह न्यूज । ०५ जून २०२१ ।  अनलॉकचे टप्पे जाहीर करताना राज्य सरकारनं नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. अपवाद वगळता आंतरजिल्हा प्रवासासाठी आता ई पासची गरज लागणार नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. पण जिथे कोरोना रुग्णसंख्या जास्त आहे अशा भागात ई- पासशिवाय प्रवास करता येणार नाही. हा प्रवासही केवळ अत्यावश्यक कारणासाठीच करता येणार आहे.

अनेक दिवसांच्या लाॅकडाऊननंतर राज्य सरकारने अनलाॅकची प्रक्रिया सुरू केली आहे. येत्या सोमवारपासून राज्यातील लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने उठवण्यात येणार आहे. त्याकरिता राज्य सरकारने जिल्हानिहाय गट तयार केले आहेत. त्यानुसार, पहिल्या गटात असलेल्या जिल्ह्यांतील लॉकडाऊन पूर्णपणे उठण्यात येणार असून रेड झोन वगळता इतर सर्व ठिकाणी जिल्हांतर्गत प्रवासासाठी आता ई-पासची गरज लागणार नाही.

राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक निर्बंध लावण्यात आले होते. मुंबईतील लोकल ट्रेनप्रमाणेच जिल्हांतर्गत प्रवासावरही कठोर बंधने घालण्यात आली होती. लॉकडाऊन काळात केवळ अत्यावश्यक कारणासाठी जिल्हांतर्गत प्रवास करण्याची मुभा देण्यात आली होती. मात्र त्या प्रवासासाठी ई पास सक्तीचा करण्यात आला होता. त्यामुळं आपापल्या गावाकडं जाणाऱ्या लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. तांत्रिक कारणामुळं कधी-कधी वेळेवर ई पास मिळत नसल्यानं लोकांची मोठी अडचण झाली होती. ही अडचण आता दूर झाली आहे.

मात्र राज्यातील अनलॉकबाबत शनिवारी मध्यरात्री राज्य सरकारनं आदेश जारी केले आहेत. राज्यातील निर्बंध टप्प्याटप्प्यानं कसे शिथील होणार याची सविस्तर माहिती सरकारच्या परिपत्रकात देण्यात आली आहे. त्यातील पहिल्या चार गटांत समावेश असलेल्या जिल्ह्यांत पूर्वीप्रमाणे प्रवास करता येणार आहे. खासगी कार, टॅक्सी, बस व पॅसेंजर रेल्वेनं प्रवास करताना ई-पासची गरज लागणार नाही. मात्र, राज्य सरकारच्या नव्या निकषानुसार पाचव्या गटात असलेल्या ठिकाणी म्हणजेच जिथे करोना रुग्णसंख्या जास्त आहे अशा भागात ई- पासशिवाय प्रवास करता येणार नाही. हा प्रवासही केवळ अत्यावश्यक कारणासाठीच करता येणार आहे. दिलासादायक बाब म्हणजे सध्या पाचव्या गटात कुठल्याही जिल्ह्याचा समावेश नाही. मात्र जर चौथ्या गटात असलेल्या जिल्ह्यांतील रुग्णसंख्या वाढली तर त्या जिल्ह्यांचा समावेश पाचव्या गटात होईल.