बेपत्ता असलेल्या त्या व्यक्तीचा आढळला मृतदेह
जळगाव लाईव्ह न्यूज । २९ सप्टेंबर २०२१ । तीन दिवसांपासून बेपत्ता जोशी पेठेतील ४६ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. शिरसोली रोडवरील कृष्णा लॉन जवळील विहिरीत आढळून हा मृतदेह आढळला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी की, विजय हरी विधाते (वय-४६) रा. जोशी पेठ हे २६ सप्टेंबर पासून घरातून बेपत्ता झाले होते. ते बेपत्ता झाल्याबाबत सोशल मिडीयात मिळाल्यास ओळख पटविण्याचे आवाहन केले होते. दरम्यान आज २९ सप्टेंबर रोजी शिरसोली रोडवरील कृष्णा लॉन परिसरात आलेल्या भालचंद्र भोळे यांच्या शेतातील विहिरीजवळून काही शेतमजूर जात होते. त्याना विहिरीजवळून जात असतांना उग्र वास आल्याने त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले तर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह पाण्यात तरंगतांना आढळून आला. यावेळी समाधान माळी आणि रवि हटकर या दोन तरूणांनी तातडीने एमआयडीसी पोलीसांनी ही माहिती कळविली.
एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी गोविंदा पाटील आणि योगेश बारी घटनास्थळी दाखल झाले. दोन दिवसांपुर्वी सोशल मिडीयावर बेपत्ता झालेल्या प्रौढ व्यक्ती माहिती टाकण्यात आली होती. याबाबत पोलीस कर्मचारी गोविंदा पाटील यांना माहिती होती. त्यांनी सोशल मिडीयावर माहिती प्रसिध्द करणाऱ्या तरूणाशी संपर्क साधला. विहिरीत पडलेल्या व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी घटनास्थळी बोलाविण्यात आले. विहिरीत पडलेली व्यक्ती ही विजय हरी विधाते असल्याचे समजले. मयतची विजय विधाते यांची पत्नी मनिषा विधाते व त्यांची मुलगी यांनी त्यांची ओळख पटविली. मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आले आहे. दरम्यान आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.