नम्रता संस्कार हा जैन समाजाचा गुण – गुलाबराव पाटील
जळगाव लाईव्ह न्यूज । १४ एप्रिल २०२२ । पालमंत्री गुलाबराव पाटील यांनी जैन समाजाचे कौतुक करताना सांगितले की, नम्रता, दातृत्व, कर्तृत्व हा जैन समाजाचा गुण आहे, कोरोनासारख्या संकटात जैन उद्योग समूह व जैन समाजातील मान्यवरांनी गरजूंना भोजनापासुन ते कोवीड सेंटर, उपचारापर्यंत आवश्यक ती मदत केली. आपण दलुभाऊ जैन व श्रद्धेय मोठेभाऊ यांच्याकडून दातृत्व व नम्रता हे संस्कार घेतले असा उल्लेख जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आवर्जून केला.
महोत्सवाचे अध्यक्ष स्वरूप लुंकड यांनी देखील सुसंवाद साधला. आ. सुरेश भोळे यांनी देखील सुसंवाद साधला. पुढली जन्मकल्याणक महोत्सव बंदिस्त बालगंधर्व नाट्यगृहात होईल त्याबाबत पाठपुरावा आपण करू असा शब्द त्यांनी दिला. कोठारी परिवारातर्फे गौतम प्रसादी देण्यात आली त्याबाबत त्यांचा पारिवारित सत्कार देखील करण्यात आला. कोठारी परिवाराच्यावतीने सौ. विमलाजी महेंद्र कोठारी यांनी अत्यंत भावपूर्ण भाषण केले. परिवाराला ज्या महनीय व्यक्तींनी सहकार्य केले, मार्गदर्शन केले त्यांच्याप्रती कृतज्ञता भाव व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन चोपडा यांनी तर आभारप्रदर्शन माजी आमदार मनीष जैन यांनी केले.
भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवाच्या निमित्ताने मॉडर्न गर्ल हायस्कूल व बालगंधर्व नाट्यगृहात रक्तदान शिबीर आयोजण्यात आले होते. जळगावच्या रेडक्रॉस सोसायटी आणि गोळवलकर रक्तपेढीने रस्तसंकलन केले. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, एकूण 235 रक्ताच्या बाटल्यांचे संकलन झाले. त्यासाठी जय आनंद ग्रुपच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. याच कार्यक्रमात शेकडो सदस्यांनी देहदान व नेत्रदानाचे संकल्प पत्र भरून घेतले. सकल जैन संघातर्फे गत दहा वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे.