जळगाव जिल्हा

जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये 7 मे रोजी लोक अदालतीचे आयोजन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


जळगाव लाईव्ह न्यूज । ११ एप्रिल २०२२ । वर्षानुवर्षे विविध कारणांनी प्रलंबित राहणारे खटले आर्थिक चणचण, वेळेचा अपव्यय या सर्व गोष्टी टाळण्यासाठी व आपआपसात सामोपचाराने तडजोड घडवून वाद मिटावेत. याकरीता राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांचे निर्देशानुसार संपूर्ण देशात एकाच दिवशी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन शनिवार, दिनांक 7 मे, रोजी करण्यात आले आहे, त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्येही याचदिवशी लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव यांनी दिली आहे.


जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारात समितीचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांच्या अध्यक्षतेखाली प्रारंभ होईल. जिल्हा वकील संघ, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगर पालिकेचे आयुक्त यांचे सहकार्य लाभणार आहे. या लोकअदालतीमध्ये मोटर वाहन ट्रॉफिक चलन, भुसंपादन, धनादेश अनादर, वैवाहिक खटले, मोटार खटले, म्युनिसीपल अपील, दिवाणी व फौजदारी प्रकरणे, न्यायालयात प्रलंबित व इतर खटले तसेच खटला दाखलपुर्व प्रकरणे व एकूण ज्या खटल्यांमध्ये कायद्याने तडजोड करता येते, असे संपूर्ण खटले ठेवण्यात आलेले आहेत.


या लोकअदालतींमध्ये आपसांत तडजोडीसाठी संपुर्ण जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर खटले ठेवण्यात आलेले आहेत. तसेच या राष्ट्रीय लोकअदालतींमध्ये राष्ट्रीयकृत बँका, कंपन्या, यांच्या संदर्भातील प्रलंबित दिवाणी व फौजदारी खटल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रक्कम वसुल होवून मिळण्याची शक्यता आहे. वादपुर्व/दाखलपुर्व खटल्यांमध्ये बॅका, कंपन्या, भ्रमणध्वनी कंपन्या, दुरध्वनी कार्यालय यांनी थकित रकमेमध्ये सुट देण्याचे प्रस्तावित केलेले आहे. तरी संबंधित थकित ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा ,


ज्या पक्षकारांना तडजोडीने आपली प्रकरणे निकाली काढायचे आहेत. त्या पक्षकार व त्यांचे विधिज्ञ यांनी तडजोडीने प्रकरणे निकाली काढावे. तसेच ऐनवेळी ज्या पक्षकारांना आपले खटले निकाली काढण्यासाठी ठेवावयाचे असतील त्यांना सुध्दा ऐनवेळी खटले निकाली काढण्याची संधी देण्यात आली आहे. तरी त्यांनी लोकअदालतीस उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन सचिव, जिल्हा व विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Related Articles

Back to top button