---Advertisement---
बातम्या

जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून राष्ट्रवादीतच रस्सीखेच?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ फेब्रुवारी २०२३ । जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या सभेत गुलाबराव देवकर यांच्या चेअरमनपदाचा आणि शामकांत सोनवणे यांच्या व्हाईस चेअरमन पदाचा राजीनामा बुधवारी एकमताने मंजूर करण्यात आला. दरम्यान जिल्हा बँकेच्या चेअरमनपदासाठी आता राष्ट्रवादी पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्येच रस्सीखेच होणार आहे. अध्यक्षपदासाठी एखाद्या नावावर एकमत न झाल्यास निवडणूक होण्याची शक्यता आहे.

ed notice jdcc

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक गुलाबराव देवकर यांनी एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने दि. ६ फेब्रुवारी रोजी आपल्या चेअरमनपदाचा राजीनामा कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांच्याकडे दिला. तसेच शामकांत सोनवणे यांनीही उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. हा राजीनामा मंजूर करण्यासाठी बुधवारी जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची सभा पार पडली. या सभेत गुलाबराव देवकर यांचा चेअरमन आणि शामकांत सोनवणे यांचा व्हाईस चेअरमनपदाचा राजीनामा वाचून एकमताने मंजूर करण्यात आला.

---Advertisement---

उपाध्यक्ष शिंदे गटाचाच होणार

जिल्हा बँकेची निवडणूक ही महाविकासआघाडी म्हणून लढविण्यात आली होती. मात्र राज्यात शिवसेनेत फूट पडली आणि त्याचा परिणाम जी जिल्हा बँकेतही दिसून आला. जिल्हा बँकेतील आध्यक्ष, उपाध्यक्ष पदाचे सूत्र बांधतांना पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याशी चर्चा करण्यात आली होती. आता पालकमंत्री शिंदेच्या शिवसेनेत असल्याने स्वाभाविकपणे उपाध्यक्षपदासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांचीच वर्णी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जिल्हा बँकेत महापौर जयश्री महाजन ह्या एकमेव ठाकरे गटाच्या संचालिका आहेत. त्यामुळे पालकमंत्र्यांशी चर्चा करूनच जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षपदाबाबत निर्णय घेतला जाणार असल्याने पुढे शिंदे गटाचाच उपाध्यक्ष होईल असे म्हटले जात आहे.

राजीनाम्यानंतर जिल्हा बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक प्रक्रिया होणार आहे. सुरूवातीचे तीन वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष राहणार आहेत. त्यामुळे अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इच्छुकांची फौज तयार आहे. राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे यांची आता खऱ्या अर्थाने परिक्षा असून जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी कुणाला संधी द्यायची यासाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात येणार असल्याचे समजते.

जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ संचालक प्रदीप देशमुख, ऍड. रवींद्र पाटील, संजय पवार, डॉ. सतीश पाटील यांची नावे चर्चेत आहेत. तर व्हाईस चेअरमन पदासाठी संचालक अमोल पाटील यांचे नाव चर्चेत असल्याची माहिती याच्यात मिळाली आहे


जिल्हा बँकेच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमनपदासाठी पुढील महिन्यात दि. ८ ते १० मार्च या कालावधीत निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इच्छुकांनी आत्तापासूनच फिल्डींग लावायला सुरूवात केली आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---