जळगाव लाईव्ह न्यूज । २२ एप्रिल २०२२ । केंद्रपुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत वैरणीसाठी शेवगा लागवड करणे (अनुसूचित जाती उपयोजना) या योजने करिता प्रती हेक्टर रु. ३० हजार प्रती लाभार्थी अनुदान उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे.
सदर योजनेंतर्गत जळगाव जिल्ह्यासाठी १५ हेक्टर क्षेत्राकरिता ४.५ लक्ष निधी वितरीत करण्यात आलेला आहे. सदर योजनेंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकरी / पशुपालकांना वैरणीकरिता शेवगा लागवड करण्यासाठी अनुदान वितरीत करण्यात येणार आहे. प्रती हेक्टर रु. ३०,०००/- अंतर्गत ७.५ किलो शेवगा ( पीकेएम-१ ) बियाणाची किंमत रु. ६७५०/- व उर्वरित अनुदान रु. २३,२५०/- हे दोन टप्प्यांमध्ये वितरीत करण्यात येणार आहे. बियाणाचा थेट पशुपालकांना पुरवठा करण्यात येणार असुन, उर्वरीत अनुदानात जमिनीची मशागत व लागवड, खतांची खरेदी व इतर अनुषंगिक खर्च करावयाचा आहे.
सदर योजनेकरिता इच्छुक असणाऱ्या पशुपालक / शेतकरी यांनी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालय, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिष्द, पशुधन विकास अधिकारी ( विस्तार), पंचायत समिती आणि नजीकचा पशुवैद्यकीय दवाखाना यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद जळगाव यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.