जळगाव लाईव्ह न्यूज । २९ मे २०२१ । जळगाव खुर्द शिवारात एका तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, तरूणाचा घातपात झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
नशिराबाद जवळील महामार्गावरील मुंजोबा मंदिरासमोर अंदाजे २५ ते ३० वयोगटातील एका अनोळखी तरुणाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला आहे. मृताचा चेहरा छिन्नविच्छिन्न अवस्थेत असल्याचे दिसून येत आहे. मयताच्या हातावर इंग्रजीत एस जान, व एस एम तसेच स्टारचे चित्र गोंदलेले आहे. नशिराबाद पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.
दरम्यान, प्रथमदर्शनी या तरूणाचा घातपात झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून याची ओळख पटल्यानंतरच पुढील तपासाचा मार्ग मिळणार आहे. या अनुषंगाने नशिराबाद पोलिसांनी मयताची ओळख पटविण्याचे आवाहन केले आहे.