गुन्हे वार्ता : शिक्षिकेला चार लाखांचा गंडा
जळगाव लाईव्ह न्यूज । १४ एप्रिल २०२२ । अमळनेर येथील शिक्षिकेच्या बँक खात्याशी परस्पर स्वत:चा आधार क्रमांक लिंक करून भामट्याने थम्ब इंप्रेशनद्वारे पावणेचार लाख रुपये काढून फसवणूक केली आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
शिक्षिका उज्ज्वला अतुल शिंदे (रा. शंकरनगर, अमळनेर) यांच्यासह त्यांचे पती अतुल शिंदे यांचे सेंट्रल बँक ऑफ इंडिया बाजारपेठ शाखा अमळनेर येथे बँक खाते आहे. दोघांचाही आधार क्रमांक त्या खात्याला लिंक आहे. त्यांचे पती अतुल शिंदे हे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात अभियंता म्हणून नोकरीला होते. त्यांचे सन २०१५ मध्ये निधन झालेले आहे. सन २०२० मध्ये कोरोना काळात शिंदे या पासबुक प्रिंट काढण्यासाठी बँकेत गेल्या होत्या. कोरोना संसर्ग कालावधी असल्याने बँक कर्मचाऱ्यांनी त्यास नकार दिला. पतीच्या निधनानंतर बँक खात्यातून त्यांचे नाव कमी करण्यासाठीही त्या बँकेत गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी पासबुकच्या प्रिंट काढल्या. त्यात त्यांच्या खात्यातून १ जून २०२० पासून ते १२ एप्रिल २०२१ पर्यंत ३ लाख ८५ हजारावर रक्कम अज्ञात व्यक्तीने एइपीएस इशुअरच्या माध्यमातून ऑनलाइन काढल्याचे निदर्शनास आले. ही फसवणूक झालेली रक्कम परत मिळण्यासाठी त्यांनी ८ जानेवारी २०२१ ते १५ जुलै २०२१ या कालावधीत बँकेकडे तीन वेळा अर्ज दिले. शिंदे यांच्या संमतीशिवाय अज्ञात व्यक्तीने परस्पर त्याचे आधारकार्ड बँक खात्याशी लिंक केले. त्याद्वारे १ जून २०२० ते १२ एप्रिल २०२२ या कालावधीत थम्ब इंप्रेशनद्वारे वेळोवेळी ३ लाख ८५ हजार २१० रुपये फसवणूक करून काढून घेतल्याचे बँक कर्मचाऱ्यांनी त्यांना सांगितले. बँक खाते उघडल्यापासून आतापर्यंत आधार लिंक करण्यासाठी अर्ज किंवा विनंती केलेली नाही.
बँकेकडूनही मेसेज आलेला नसल्याचे शिंदे यांनी सांगितले. आजपर्यंत बँकेकडून कार्यवाही न करण्यात आल्याने त्यांनी मंगळवारी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.