जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मार्च २०२३ । खेड येथील गोळीबार मैदानावर उद्या (ता.१९) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होत आहेत. उद्या होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या या सभेची जबाबदारी शिंदे गटाचे नेते, माजी मंत्री रामदास कदम आणि त्यांचे चिंरजीव आमदार योगेश कदम यांच्यावर आहे. कदम पिता-पुत्रांनी या सभेसाठी जोरदार तयारी केली आहे.

रामदास कदम यांनी सभेच्या तयारीचा आढावा घेतला. त्यावेळी “अफजल खान जसा लाखो सैन्य घेऊन महाराष्ट्रावर चाल करून आला होता, अगदी तसेच उद्धव ठाकरे संपूर्ण महाराष्ट्रातून लोक घेऊन खेडच्या सभेला आले होते,” अशा शब्दात रामदास कदम यांनी ठाकरेंवर टीका केली.
“१९ मार्चला होणारी सभा ही फक्त कोकणवासीयांची असेल आणि तुम्हाला समजेल कोकणी जनता ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रामदास कदम यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी उठाव केला नसता तर आम्ही राजकारणातून संपलो असतो. त्यामुळे उद्याची सभा ऐतिहासिक ठरेल,”