⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

जळगाव मधील मेहरुणची बोरं आणि मेहरुण तलावाचा आहे थेट औरंगजेबशी संबंध, वाचा सविस्तर

जळगाव लाईव्ह न्यूज | १० डिसेंबर २०२२ |  जळगावची अवीट गोडीची व आरोग्यवर्धक मेहरुणी बोरे सर्वत्र प्रसिद्ध आहेत. ही बोरे आकाराने लहान, रसाळ व अवीट गोडीची म्हणून प्रसिद्ध आहेत. मेहरूणच्या बोरांचा गोडवा राज्यभर लोकांच्या जिभेवर असल्याने त्याला मागणीही खूप असते. पुणे, मुंबईला राहणारे नातेवाईक हक्काने मेहरुणची बोरं मागवून घेतात. राज्यभर प्रसिध्द असलेल्या या बोरांना मेहरुणची बोरं का म्हणतात? या मागे मोठा रंजक इतिहास आहे. याचा संबंध थेट औरंगजेबशी येतो, आज आपण मेहरुणच्या बोरांचा इतिहास जाणून घेणार आहोत…

जळगाव शहरानजीकच्या मेहरुण शिवारात त्यांची शेती पूर्वी केली जायची. हा भाग जळगाव शहरात समाविष्ट झाला, तशी तिथली शेती कमी होत गेली. मात्र, जळगाव तालुक्यातील विविध भागांत म्हणजे शिरसोली, म्हसावद, बोरनार, जळगाव खुर्द, बेळी, कानळादा, नांद्रा, आव्हाणे, खेडी खुर्द व वडनगरी आदी गावांपर्यंत या बोरांचा प्रसार झाला. या गावांतील शेतांच्या बांधावर त्याची झाडे दिसून येतात. काही शेतकर्‍यांनी २५ ते ३० वर्षांपासून त्यांचे चांगले जतन केले असून, ते दर वर्षी उत्पादन घेतात. ही बोरं जळगावच्या मेहरुण भागात घेतली जायची म्हणून यास मेहरुणची बोरं म्हणतात, अशी ढोबळ माहिती सर्वांनाच आहे. मात्र त्या भागाला मेहरुण का म्हणायचे व बोरांना मेहरुण हे नाव कसे पडले, हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्यासाठी अनेक वर्षे मागे म्हणजे मुगलांच्या काळात जावे लागणार आहे.

उपलब्ध असलेल्या ऐतिहासिक माहितीनुसार मेहरुन्निसा नावाची मुगल शासक औरंगजेब यांची पाचवी कन्या होती. तिच्या नावावार त्याकाळातील खानदेशातील अनेक भागांची जहागिरी होती. त्यात आजच्या जळगावचा देखील समावेश होतो. त्याकाळी जळगाव परिसरात मोठ्या प्रमाणात बोरांची झाडे होती. ही बोरं मेहरुन्निसा खूप आवडत असे, मुघल साम्राज्याच्या काळात दरवर्षी या बोरांच्या करंड्या औरंगजेबकडे रवाना होत असल्याचा उल्लेख जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रकाशित केलेल्या कॉफीटेबल बुकमध्येही करण्यात आला आहे. यासह इंटरनेटवर देखील याची माहिती काही ठिकाणी सापडते.

जळगावच्या भागातील बोरं मेहरुन्निसाला खूप आवडत असे, शिवाय या भागाची जहागिरी देखील मेहरुन्निसाकडे असल्याने त्या बोरांना मेहरुन्निसाची बोरं असे म्हटले जाऊ लागले. कालांतराने मेहरुन्निसा या शब्दाचा अपभ्रंश होवून मेहरुण असा शब्द प्रचिलित झाला. मेहरुन्निसाकडे असलेल्या जहागिरीमुळे या भागाची ओळख मेहरुण म्हणून रुढ झाली आहे. याच भागात असलेल्या तलावाला देखील मेहरुणचा तलाव असे म्हटले जाते.

एक झाड देते क्विंटलभर बोरे

अनेक शेतकरी हे पीक बांधावरचे म्हणून घेतात. वेचणी, मजुरी, वाहतुकीव्यतिरिक्त फारसा खर्च या पिकाला येत नाही. त्यामुळे आर्थिक बळ देणारे महत्त्वाचे कोरडवाहू पीक म्हणून मेहरुण बोरांकडे पाहिले जाते. बोरीला दोन बहार येतात. झाड मोठे असेल तर १०० ते १२५ किलो बोरे मिळतात. दुसरा बहार येतो तेव्हा या बोरांचा आकार लहान झालेला असतो. त्यास खिरणी बोर म्हटले जाते. संक्रांतीनंतर खिरणी बोरांचा सिझन सुरू होतो. मात्र आता काँक्रीटचे जंगल वाढत असल्याने मेहरुणची झाडं देखील दिसेनासी होत आहे. मेहरुणच्या बोरांची राज्यभर विशेष ओळख आहे, यामुळे या झाडांचे व या वाणाचे जतन करण्याची आवश्यकता आहे.