⁠ 
मंगळवार, एप्रिल 30, 2024

बालरंगभूमी परिषदेच्या मध्यवर्ती कार्यकारिणी योगेश शुक्ल बिनविरोध

जळगाव लाईव्ह न्यूज । २ एप्रिल २०२४ । महाराष्ट्र राज्यातील बालरंगभूमीकरिता महत्वाचे कार्य करणारी संस्था म्हणून बालरंगभूमी परिषद कार्य करीत आहे. बालरंगभूमी परिषदेच्या नुकत्याच पुणे येथील हॉटेल आर्किडमध्ये पार पडलेल्या पंचवार्षिक निवडणूकीत अभिनेत्री नीलम शिर्के सामंत यांच्यासह १६ जणांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यात जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी जळगावचे रंगकर्मी योगेश शुक्ल यांचीही बिनविरोध निवड झाली आहे.

निवडणूकीत विजयी झालेल्या उमेदवारांमध्ये अभिनेत्री नीलम शिर्के-सामंत यांची एकमताने अध्यक्षपदी तर बीडमधील दीपा क्षीरसागर उपाध्यक्षपदी, चिल्ड्रन्स थिएटर अॅकॅडमीचे संचालक, नाट्यनिर्माते-दिग्दर्शक राजू तुलालवार यांची कार्याध्यक्षपदी तर नगरचे सतीश लोटके यांची प्रमुख कार्यवाहपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून १७ जणांची बालरंगभूमी परिषदेची नवीन कार्यकारिणी एकमताने निवडण्यात आली. यात जळगाव – धुळे – नंदुरबार विभागासाठी रंगकर्मी योगेश शुक्ल व नंदुरबारचे नागसेन पेंढारकर यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली आहे. प्रमुख सल्लागार म्हणून पाच दशकांपासून बालरंगभूमीवर कार्य करणारे प्रकाश पारखी (पुणे) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

इतर निवडण्यात आलेल्या प्रतिनिधींमध्ये सहकार्यवाहपदी दिपाली शेळके (शिरुर), आसेफ शेख (छत्रपती संभाजीनगर), कार्यकारिणी सदस्यात ॲड.शैलेश गोजमगुंडे (लातूर), आनंद खरवस (सोलापूर), अनंत जोशी (अहमदनगर), वैदही चवरे सोईतकर (नागपूर), धनंजय जोशी (सांगली), आनंद जाधव (नाशिक), त्र्यंबक वडसकर (परभणी), नंदकिशोर जुवेकर (परभणी) यांचा समावेश आहे. सदर निवडणुकीकरिता निवडणुक अधिकारी म्हणून नरेश गडेकर (नागपूर) यांनी काम पाहिले.

अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच नीलम यांनी काही महत्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. यात दरवर्षी वेगवेगळ्या शहरांमध्ये बाल रंगभूमीचे संमेलन घेऊन त्यात नाटयासह नृत्य, गायन, वादन या कार्यक्रमांसोबत मुलांना भावणाऱ्या सर्व रंगमंचीय कलाकृतींचा महोत्सव भरवण्याची योजना आहे. बाल रंगभूमीवर कार्य करणाऱ्या रंगकर्मींचा सन्मान, लहान मुलांना प्रकाशयोजना, नेपथ्य, रंगभूषासारख्या विविध तांत्रिक बाबींची माहिती देऊन त्यांना प्रशिक्षित करणे, तसेच पालकांकरिताही कार्यशाळा घेणे, बालनाट्य संस्थांना विविध उपक्रमांसाठी अनुदान मिळवून देणे, बालनाट्य प्रयोगांना नाटयगृहांमध्ये सार्वजनिक सुट्टीच्या तारखा मिळवून देण्यासाठी आग्रह धरणे. चित्रकला, हस्तकला, शिल्पकला या कलांची गोडी मुलांना लागावी यासाठी कार्यशाळा आणि महोत्सव भरविण्याचे कामही भविष्यात बालरंगभूमी परिषदेच्या माध्यमातून केले जाणार आहे.