⁠ 
शनिवार, मे 4, 2024

खडसेंचे पुनर्वसन : जळगाव भाजपात आ.भोळेंचे तर शिवसेनेत महाजनांचे वर्चस्व वाढणार!

जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । राज्यातील ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने विधानपरिषद निवडणुकीची उमेदवारी जाहीर केली आहे. तब्बल सहा वर्षांनी एकनाथराव खडसे यांचे राजकीय पुनर्वसन होणार असून त्यांना मंत्रिपद मिळण्याची देखील शक्यता व्यक्त होत आहे. खडसेंच्या पुनर्वसनमुळे पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाचे लक्ष जळगावकडे लागले असून आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने काही घडामोडी अपेक्षित आहेत. जळगाव शहराचा सामाजिक आढावा घेतला असता लेवा पाटील मतदार समोर ठेवून येणाऱ्या काळात भाजपकडून विद्यमान आमदार सुरेश भोळे यांना तर शिवसेना, महाविकास आघाडीकडून जयश्री महाजन यांना बळ दिले जाण्याची शक्यता आहे.

राज्याचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांना भाजपच्या मंत्रिमंडळात असताना आरोपांमुळे आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. गेल्या ४० वर्षांची पक्षनिष्ठा लक्षात घेऊन पक्ष आपले लवकरच पुनर्वसन करेल अशी आशा लावत खडसेंनी भाजपात पाच वर्ष प्रतीक्षा केली. पक्षाकडून काहीही निर्णय होत नव्हता उलट घुसमट वाढत असल्याने खडसेंनी भाजपला रामराम करीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. एकनाथराव खडसे राष्ट्रवादीत गेल्याने त्यांचे पक्षाकडून पुनर्वसन होणार आणि त्यांना पुन्हा विधानमंडळात प्रवेश मिळणार अशी चर्चा तेव्हा रंगू लागली होती.

राष्ट्रवादीने राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या यादीत खडसेंच्या नावाची देखील शिफारस केली मात्र दीड वर्षापासून यादीत प्रलंबित आहे. गेल्या सहा वर्षापासून खडसेंना कुठे संधी मिळत नसल्याने ते सक्रिय राजकारणापासून काहीसे लांब गेले होते. याच कालखंडात आपल्या जवळचे कोण? आणि दूरचे कोण? हे देखील खडसे यांना लक्षात आले असावे. खडसे आता राजकारणातून बाद होणार असा अंदाज बांधत अनेकांनी उतावीळ होत स्वप्नांचे पूल बांधण्यास सुरुवात केली होती. खडसे फारसे सक्रिय नसल्याने राज्यात विरोधात असतानाही जिल्ह्यात भाजपा जोर करीत होती. सर्व आपल्याच अधिपत्याखाली असून येणाऱ्या काळात भाजपचं वरचढ असेल असे वक्तव्य भाजपचे नेते आणि पदाधिकारी वारंवार बोलून दाखवत होते.

हे देखील वाचा : अन् राष्ट्रवादी काँग्रेसने नाथाभाऊंना दिलेला शब्द पाळला .. भाऊ ‘पुन्हा’ आमदार होणार

खडसे बॅक फूटवर असल्याने जळगाव, मुक्ताईनगर, भुसावळ आणि रावेर विधानसभा मतदारसंघातील सर्व चित्र बदलणार असा कयास बांधला जात होता. जिल्हा परिषद, जळगाव मनपा, लोकसभेला देखील भाजपच पुढे असणार असे कयास अनेकांनी लावले होते. जिल्ह्याच्या दृष्टीने जळगाव शहर हा महत्वाचा केंद्रबिंदू मानला गेला आहे. जळगाव शहरात लेवा पाटील समाज मोठ्या प्रमाणात आणि एक संघ असल्याने याच समाजाचे वर्चस्व जास्त आहे. जिल्ह्यात देखील लेवा पाटील समाज अधिक असून एकनाथराव खडसेंना मानणारा मोठा वर्ग समाजात आहे. नुकतेच होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने एकनाथराव खडसे यांना उमेदवारी देत त्यांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला. खडसेंची विधान मंडळात एंट्री होताच त्यांना मंत्रिपद देखील मिळण्याची शक्यता आहे. खडसे परतल्यावर भाजपला नवीन रणनीती आखावी लागणार आहे. गेल्या टर्ममध्ये देखील भाजपने लेवा पाटील समाजाला जोडून ठेवण्यासाठी स्व.हरिभाऊ जावळे यांची महामंडळावर नियुक्ती करीत त्यांना मंत्रिपदाचा दर्जा दिला होता.

जळगाव शहरातील लेवा पाटील समाजाच्या बळावर गेल्या दोन टर्म आमदार सुरेश भोळे हे निवडून आले आहेत. काही महिन्यांपूर्वी आमदार भोळे यांचे नाव रावेर लोकसभा निवडणुकीसाठी चर्चेत होते तर गेल्याच महिन्यात ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना पेव फुटले होते. राष्ट्रवादीकडून खडसेंचे पुनर्वसन झाल्यास जळगावात लेवा पाटील समाज पुन्हा त्यांना साथ देणार आणि राष्ट्रवादी आणखी बळकट होणार या भीतीपोटी भाजपला आमदार सुरेश भोळे यांना आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी संधी द्यावीच लागणार आहे. आमदार भोळे सध्या जळगाव शहराचे विद्यमान आमदार, जिल्हा दूध संघातील संचालक, भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष असल्याने त्यांना पक्षाकडून आणखी एखादे मोठे पद मिळण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे जळगाव मनपातील भाजपच्या गडाला सुरुंग लावत महाविकास आघाडीने विशेषतः शिवसेनेने करेक्ट कार्यक्रम करून मनपात शिवसेनेची सत्ता प्रस्थापित केली. शिवसेनेकडून महापौरपदी जयश्री महाजन यांची वर्णी लागली. राज्यात आघाडीची सत्ता असल्याने त्याचा फायदा येत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून शहरासाठी काही ना काही पदरात पाडून घेण्यासाठी महापौर जयश्री महाजन यांनी पाठपुरावा सुरू केला. महापौरांच्या प्रयत्नांना यश देखील आले. महापौर जयश्री महाजन यादेखील लेवा पाटील समाजाच्या असून जळगाव शहराच्या उच्चशिक्षित महिला महापौर म्हणून त्यांची ओळख आहे. महापौरांचे महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांशी जवळच्या संबंध असून ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांचे त्यांनी अनेक वेळा भेट देखील घेतली आहे. भेटी निमित्ताने महापौरांचे पती मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या वावड्या देखील तेव्हा काही पक्षांतर्गत मंडळींनी उठवल्या होत्या मात्र महाजन यांनी त्याचे खंडन करीत सेनेतील काम सुरू ठेवले.

हे देखील वाचा : भाजपने मला अडगळीत टाकले आणि पवारांनी मला बाहेर काढले : खडसे

एकनाथराव खडसे राष्ट्रवादीत आल्यापासून महाविकास आघाडीने जळगावकडे लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे. अनेक दिग्गज नेते, पदाधिकारी गेल्या काही महिन्यात जळगावात येऊन गेले आहेत. जळगाव शहरातील सामाजिक दृष्टीकोन लक्षात घेता शिवसेनेला शहरावर पकड मजबूत करायची असल्यास लेवा समाजाचा महिला चेहरा म्हणून महापौर जयश्री महाजन यांना बळ दिले जाण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी एकत्रितपणे आगामी निवडणुका लढविणार असल्यास त्यांना लेवा पाटील समाजाचे मतदान सोडून चालणार नाही. महापौर जयश्री महाजन सध्या जळगाव शहराच्या महापौर, जिल्हा बँकेच्या संचालिका आणि ग.स.सोसायटीच्या तज्ज्ञ संचालिका देखील आहेत. महाजन यांना पक्षाने वर्चस्व निर्माण करण्याची संधी दिल्यास येणाऱ्या निवडणुकांमध्ये काही वेगळेच चित्र पाहायला मिळेल यात शंका नाही.