⁠ 
सोमवार, मे 6, 2024

Assembly Live : अजितदादा आमच्या निवडून येण्याची चिंता तुम्ही करू नका : आ.गुलाबराव पाटील

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जुलै २०२२ । जे शिवसेना सोडून जातात ते निवडून येत नाही, असे अजितदादा म्हणाले, आम्ही शिवसेना सोडलेली नाही त्यामुळे आमच्या निवडून येण्याची चिंता तुम्ही करू नये., असा टोला गुलाबराव पाटील यांनी लगावला. ते पुढे म्हणाले, आम्ही त्याच शिवसैनिकांच्या भरवशावर इकडे आलो आहेत. मला सांगा ५५ पैकी ४० आमदार कधी तुटतात का? आमच्याकडे नितीन गडकरींची सभा होती तेव्हा एक उपजिल्हाप्रमुख भाजपात प्रवेश करणार होतो, मी त्याला रात्रभर घेऊन बसलो आणि चर्चा केली. एकनाथ शिंदे यांना आमदार व्हायचं नव्हते. आम्ही सर्व आमदार समस्या घेऊन वर जात होते, आमचं काम होत नाही म्हणून वेळ मागत होते पण चहा पेक्षा किटली गरम, असे पाहायला मिळाले. आज आम्ही इथे बसलो ते बाळासाहेबांमुळेच, असे घणाघाती भाषण गुलाबराव पाटील यांनी केले.

विधानमंडळातील विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावर बोलताना आ.गुलाबराव पाटील यांनी जोरदार भाषण केले. आ.पाटील म्हणले, मी १७ वर्षांचा असताना शिवसेनेत काम सुरु केलं. आम्हाला पुढे निवडणूक लढायला लागेल असं वाटलंही नव्हतं. मराठी माणसाच्या हक्कांसाठी आणि हिंदुत्वाचं रक्षण करणारी संघटना म्हणजे शिवसेना. बाळासाहेबांकडे पाहून आम्ही संघटनेत आलो. लोकांची सेवा करण्यासाठी सत्ता हे साधन समजून काम करावं लागेल असं बाळासाहेबांनी सांगितलं होतं. आमच्यावर अनेकांकडून बंड केल्याची टीका होत आहे. आम्हाला जे मिळालं आहे बाळासाहेबांमुळे मिळालं आहे. आम्ही बंड केलेलं नाही तर उठाव केला आहे. माझ्यासारख्या टपरीवाल्यावर टीका केली गेली. धीरुभाई अंबानीही पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायचे, मुख्यमंत्री रिक्षा चालवायचे हा इतिहास आहे अशी आठवण गुलाबराव पाटील यांनी करुन दिली.

शिवसेना १९८४ नंतर महाराष्ट्रात आली, तत्पूर्वी ती केवळ ठाण्यासाठी होती. तेव्हा आम्हाला माहिती देखील नव्हते कि आपल्याला निवडणूक लढवावी लागेल. १९८९ मध्ये शिवसेनेने भाजपसोबत युती केली आणि भाजपचे ५ तर सेनेचे ४ खासदार निवडून आले. तेव्हा आपल्यासारख्या मुलांना वाटले कि आपण देखील राजकारणात उतरायला हवे. १९९५ मध्ये शिवसेना संपर्कप्रमुखांचे थांबण्याचे ठिकाण आनंद दिघे साहेबांचे ठाणे होते. आम्ही बंड केलेले नाही आम्ही उठाव केला आहे. शिवसेना जेव्हा जन्माला आली तेव्हा सत्तेचे विकेंद्रीकरण बाळासाहेबांनी केले. टपरीवाला, चहावाला, पुंगीवाला, ज्याला राजकारणात काही काम नव्हते अशा सर्वसामान्यांना पुढे आणण्याचे काम बाळासाहेब ठाकरेंनी केले, असा उल्लेख आ.गुलाबराव पाटील यांनी केला.

गेल्या दोन वर्षांपासून हे काही सुरु होते ते फार मोठे आहे. आमच्यावर अनेकांनी टीका केली. आज आम्ही इथे पोहचलो आहोत पण आम्ही सहज आमदार झालेलो नाही, वर्ष वर्ष जेलमध्ये राहिलेले, तडीपारी भोगलेले, ३०२, ३०७ भोगलेले आम्ही लोक आहोत. हातात झेंडा घेत जय भवानी, जय शिवाजी करीत इथपर्यंत पोहोचलेलो आम्ही कार्यकर्ते आहोत. आम्हाला शिवसेना वाढवायची आणि वाचवायची होती. असेही आ.पाटील म्हणाले.