जळगाव लाईव्ह न्यूज । १७ डिसेंबर २०२३ । पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यातील १८२१ जिल्हा परिषद शाळांच्या बळकटीकरणासाठी ४ कोटी ५३ लाखांचा निधी जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून मंजूर केला आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांचे रूपडं पालटणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.
जिल्हा वार्षिक योजना २०२३-२४ मधून विशेष दुरुस्ती योजनेअंतर्गत स्वच्छतागृह, शौचालय, वर्ग खोल्यांची दुरुस्ती, वर्गातील इलेक्ट्रिक फिटिंग या कामांसाठी ४ कोटी ५३ लाखाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या वर्ग खोल्यांमध्ये पुरेसा प्रकाश असेल तर विद्यार्थ्यांना कोणतेही नेत्र विकार होणार नाहीत,वर्गात पुरेशी हवा खेळती रहावी म्हणून जिल्ह्यातील सर्व १८२१ जिल्हा परिषदेच्या शाळांमधील ६६९१ वर्ग खोल्यांमध्ये प्रत्येक वर्ग खोलीत दोन एलईडी ट्यूब व एक पंखा बसवण्यासाठी १ कोटी ८५ लक्ष रुपयाची तरतूद तसेच वर्ग खोल्यांची दुरुस्ती, स्वच्छतागृह, शौचालय यांची दुरुस्ती, रॅम्पची दुरुस्ती, वर्ग खोल्यांमध्ये इलेक्ट्रिक फिटिंग या कामासाठी २ कोटी ७९ लाख असा एकूण ४ कोटी ५३ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन व मदत, पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांचे मार्गदर्शन लाभल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
निपुण भारत कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळांच्या गुणवत्ता विकासासाठी जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषद अनेक उपक्रमांची अंमलबजावणी करीत आहे, त्याचाच एक भाग म्हणून आज जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांसाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे. यापूर्वी देखील पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ५०० पेक्षा जास्त जिल्हा परिषद शाळांसाठी संरक्षक भिंतीचे काम पूर्ण करण्यात आलेले आहे.आता मंजूर झालेली सर्व कामे देखील अतिशय गुणवत्तापूर्ण, दर्जेदार व तात्काळ पूर्ण करावीत अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत.
नुकतीच जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, यांची मॅरेथॉन बैठक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. सदर सभेत प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी सविस्तर आढावा सादर केला. प्राथमिक शिक्षणाचा आणि जिल्हा परिषद शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सलग चार तास तालुका निहाय आढावा घेतला. महिन्याच्या दुसऱ्या/तिसऱ्या गुरुवारी यापुढे देखील असाच आढावा घेण्यात येणार आहे.
या आढाव्यात गटशिक्षणाधिकारी शिक्षण विस्तार अधिकारी आणि केंद्रप्रमुख यांनी केलेल्या शाळा भेटी व त्यात गुणवत्तेसाठी केलेले कामकाज याचा नियमित आढावा घेतला जाईल. अशी माहिती शिक्षणाधिकारी प्राथमिक विकास पाटील यांनी दिली आहे.