⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

जिल्हा परिषद : महाविकास आघाडी करण्यासाठी राष्ट्रवादी उत्सुक नाही?

जळगाव लाईव्ह न्युज | चिन्मय जगताप | येत्या पंधरा दिवसात निवडणुका जाहीर करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आणि जळगाव जिल्ह्यातील जिल्हा परिषदेमध्ये राजकीय गणित आखायची सुरुवात झाली आहे. नुकत्याच झालेल्या शिवसेनेच्या बैठकीमध्ये भाजपाला धोबीपछाड द्यायचा असेल तर महाविकासआघाडी पॅटर्न जळगाव जिल्ह्यात राबवायला हवा असे एकमताने ठरले. मात्र महाविकास आघाडी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस उत्सुक नाही असे चित्र उभे राहत आहे.

जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवायचं असेल तर राष्ट्रवादी शिवसेना आणि काँग्रेस एकत्र येऊन निवडणुका लढवू असा सूर नुकताच झालेल्या जिल्हा परिषदेच्या शिवसेनेच्या बैठकीत उमटला होता. मात्र अजून पर्यंत आम्हाला याबाबतचा कोणताही प्रस्ताव मिळालेला नाही. आम्ही पूर्ण ताकदीने जिल्हा परिषदेची निवडणूक लढवणार आहोत. लवकरच या संदर्भातल्या स्थानिक बैठका होणार असून वरिष्ठांकडे सर्व अहवाल पाठवणार आहोत. व त्यानंतर पुढे काय तो निर्णय घेऊ. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील यांनी जळगाव लाईव्हशी बोलताना दिली. यामुळे जिल्हा परिषदेमध्ये महाविकास आघाडी होणार की नाही ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

जिल्हा परिषदेचा कार्यकाळ संपला तेव्हा जळगाव जिल्हा परिषदेत एकूण 67 जागा होत्या ज्यामध्ये ३० भाजपाकडे, 16 राष्ट्रवादीकडे, 14 शिवसेनेकडे आणि ४ या काँग्रेसकडे होत्या. काँग्रेसचे दोन सदस्य भाजपाने आपल्या गळाला लावले आणि आपली सत्ता बसवली. गेल्या कित्येक वर्षापासून जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व आहे. मात्र ते आता हाणून पाडण्यासाठी शिवसेना महाविकासआघाडी चा फॉर्मुला राबवण्यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र याबाबत आम्हाला शिवसेनेतर्फे कोणताही प्रस्ताव आलेला नाही. अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील यांनी सद्यस्थितीत तरी महाविकास आघाडीच्या चर्चांना पूर्णविराम दिला.