⁠ 
शुक्रवार, फेब्रुवारी 23, 2024

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण जागीच ठार, धरणगावमधील घटना

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ नोव्हेंबर २०२३ । जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले असून अशातच भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना धरणगाव तालुक्यातील पिंपळे व निशाणी फाट्याजवळ घडली. सागर छगन कोळी (वय-२८) असं मृत तरुणाचे नाव असून याबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?
धरणगाव तालुक्यातील नांदेड येथे सागर कोळी हा तर आपले आई-वडील व मोठा भाऊ यांच्यासह वास्तव्याला आहे. सागर कोळी हा गुरुवारी २३ नोव्हेंबर रोजी सकाळी दुचाकी क्रमांक (एमपी ४६ एमके ३१६) ने धरणगाव शहरात बाजारात जात होता. त्यावेळी पिंपळे व निशाणी फाट्याच्या जवळील रस्त्यावरून जात असतांना समोरून अज्ञात भरधाव ट्रकने त्याच्या दुचालिकेला जोरदार धडक दिली.

या धडकेत सागर कोळी हा तरुण जागीच ठार झाला, दरम्यान अपघात घडल्यानंतर ट्रक चालक हा ट्रक घेऊन पसार झाला होता. घटनेची माहिती मिळाल्यानंतर मयत तरुणाच्या कुटुंबाने एकच आक्रोश केल्याचे पहायला मिळाले. या संदर्भात सागर कोळी यांचे काका भागवत यशवंत कोळी यांनी धरणगाव पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार दुपारी २ वाजता अज्ञात ट्रक चालक विरोधात धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक प्रदीप पवार करीत आहे.