
जळगाव लाईव्ह न्यूज । पाळधी- तरसोद बायपासवर आणखी एक भीषण अपघात झाला आहे. आजोबांच्या वर्षश्राद्धासाठी येणाऱ्या बहिणीला घेण्यासाठी जळगावला येणाऱ्या तरुणाच्या दुचाकीला कंटेनरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाला. ललित मनोहर झंवर (३०, मूल रा. पाळधी, ता. धरणगाव, ह. मु. प्रेमनगर, जळगाव) असं अपघतातील मृत तरुणाचं नाव आहे.
पाळधीच्या टाकळी फाट्यानजीक हा भीषण अपघात घडला. पिंप्राळा परिसरात राहणारे विमा एजंट ललित झंवर यांच्या आजोबांचे ५ ऑक्टोबर रोजी वर्षश्राद्ध असल्यामुळे सर्व जण पाळधी येथे मूळ गावी गेलेले होते. वर्षश्राद्धासाठी ललित यांची बहीण येणार असल्याने तिला घेण्यासाठी ते दुचाकीने जळगाव रेल्वे स्थानकावर येत होते.
पाळधी येथून बायपासवरून येत असताना टाकळी फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीला कंटेनरने धडक दिली. त्यामुळे ते रस्त्यावर फेकले गेले. त्यांना नागरिकांनी जीएमसीत दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
एकुलत्या एक मुलाच्या अकाली जाण्याने संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. विशेष बायपासवर अपघातांचे सत्र सुरूच असून आठवड्यातून दोन ते तीन अपघात होत आहेत. गेल्या दोन महिन्यात हा आठवा बळी असून एकेरी वाहतुकीमुळे दोन्ही बाजूंची वाहने एकाच दिशेने जात असल्याने अपघातांचा धोका अधिकच वाढला आहे.





