सोमवार, सप्टेंबर 18, 2023

दारूसाठी पैसे मागण्याच्या वादातून तरुणावर चॉपरने हल्ला

जळगाव लाईव्ह न्यूज। ३१ जुलै २०२३। दारू पिण्यासाठी पैसे मागण्यावरून सुरू असलेला वाद सोडविण्यासाठी गेलेल्या तरूणावर चॉपरने वार करण्यात आला. तसेच जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार शहरातील ओम मंगल कार्यालयाजवळ घडला आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिनेश वसंत वाणी (वय-३४) रा. बळीराम पेठ, जळगाव हा तरूण २९ जुलै रोजी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास त्याचे मित्र प्रकाश बाबुराव चौधरी आणि गोविंद राजेंद्र चौधरी हे ओम मंगल कार्यालयाजवळ उभे होते. त्यावेळी दारूसाठी पैसे मागण्यावरून प्रकाश चौधरी आणि गोविंद चौधरी यांच्यात वाद झाला. हा वाद सोडविण्यासाठी दिनेश वाणी याने वाद सोडविण्यासाठी मध्यस्थी केली. त्यानंतर या रागातून गोविंद चौधरी याने दिनेश वाणी यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागण्यास सुरूवात केली. त्यानंतर जीवेठार मारण्याची धमकी देत सोबत असलेला चॉपर काढून दिशेनच्या कमरेवर वार करून जखमी केले.

हा प्रकार घडल्यानंतर जखमी दिनेशला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी रविवारी ३० जुलै रोजी रात्री १० वाजता दिनेश वाणी याने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी गोविंद राजेंद्र चौधरी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मुबारक तडवी करीत आहे.