⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

तरुणांचा विश्वास उद्धव ठाकरेंवर : विविध धर्माचे लोकही आपल्या सोबत

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ ऑक्टोबर २०२२ । शिवसेना पक्षात होणारे प्रवेश म्हणजे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर तळागाळातील सामान्य लोकांच्या असणार्‍या विश्वासाचे प्रतीक आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. राजकारणाशी संबंधित नसलेले तसेच विविध धर्माचे लोकही आमच्यासोबत येत आहेत. तुम्ही लढा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असे सामान्य नागरीक आम्हाला सांगताय, हेच आमचं सौभाग्य आहे, असे प्रतिपादन संपर्कप्रमुख विलास पारकर यांनी शहरातील अमरदीप चौकातील सभेत केले.

शिवसेनेत वाढले इनकमिंग
52 तरुणांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाचे शिवबंधन बांधून संपर्कप्रमुख विलास पारकर, संपर्क प्रमुख सुरेश राणे, सहसंपर्क प्रमुख मनोहर पाटील, जिल्हाप्रमुख समाधान महाजन, जिल्हा संघटक गजानन मालपुरे, सह समन्वयक उत्तम सुरवाडे, उपजिल्हा संघटक संजय ब्राम्हणे व सर्व प्रमुख पदाधिकार्‍यांनी यापुढील सामाजिक आणि राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या विभागात शहर समन्वयक नमा शर्मा आणि शेख महबुल यांच्या मार्गदर्शनाखाली दोन शाखांचे उद्घाटन झाले. सत्ता गेल्यावरही शिवसेना पक्षात इनकमिंग सुरूच आहे.

बाळासाहेबांनी केला सर्वच धर्माचा आदर
बाळासाहेबांनी सर्व धर्माचा आदर केला आणि तीच परंपरा उद्धव ठाकरे यांनी कायम ठेवली आहे म्हणूनच आज असंख्य विविध समाजाचे बांधव शिवसेनेत प्रवेश करीत आहेत, असे जिल्हाप्रमुख समाधान महाजन म्हणाले. जाम मोहल्ला परीसर हा मुस्लिम बहुल असून या भागाचा विकास करण्याच्या दृष्टीकोणातून इंडियन मुस्लिम लीग मधून शिवसेनेत प्रवेश केला आहे, असे सय्यद सादिक अली म्हणाले. सूत्रसंचालन तालुकाप्रमुख संतोष सोनवणे तर आभार कट्टर शिवसैनिक उमाकांत (नमा) शर्मा यांनी मानले.