⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

अजिंठा लेणीत तरूणाचा थरार; सेल्फीच्या नादात कोसळला ७० फूट खोल कुंडात

जळगाव लाईव्ह न्यूज। २४ जुलै २०२३। पर्यटनासाठी आलेल्या एक तरुणाला सेल्फीचा नाद चांगलाच महागात पडला. अजिंठा लेणीतील सातकुंडामधील प्रथम क्रमांकाच्या ७० फूट कुंडामध्ये सेल्फी काढत असताना तरुण पाय घसरून पडला. रविवारी सुट्टी असल्यामुळे गोपाल हा मित्रांसह अजिंठा लेणी बघण्यासाठी आला होता. लेणी बघत असताना लेणी परिसरामध्ये असलेल्या सात कुंड धबधबा परिसरामध्ये सेल्फी घेण्याची इच्छा गोपालला झाली. ७० फूट कुंडामध्ये सेल्फी काढत असताना तो पाय घसरून पडला.

दरम्यान भारतीय पुरातत्व विभाग, सुरक्षा रक्षक व फर्दापूर पोलिसांनी वेळीच दक्षता घेऊन त्याला कुंडातून सुखरूप बाहेर काढले. तरुणाच्या सुटकेचा थरार कॅमेरात कैद झाला आहे. या प्रकरणी मिळाल्या माहितीनुसार, गोपाल पुंडलिक चव्हाण (वय ३५ वर्ष, रा. नांदा तांडा ता. सोयगाव जि. छत्रपती संभाजीनगर) असे तरुणाचे नाव आहे.

यावेळी सेल्फी काढत असताना त्याचा तोल गेला आणि तो तब्बल सत्तर फूट खोल असलेल्या कुंडामध्ये जाऊन पडला. दरम्यान कुंडामध्ये पाणी असल्यामुळे तो पाण्यात पडला, मात्र त्याला पोहता येत असल्यामुळे तो कठड्यावर आला. यावेळी घटनेची माहिती भारतीय पुरातत्त्व विभाग, सुरक्षा विभाग तसेच संबंधित पोलिसांना मिळाली. तात्काळ त्यांचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.