जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मार्च २०२२ । जळगावमधील वाढती गुन्हेगारी पोलिसांना आव्हान देणारी ठरते आहे. छोट्या मोठ्या गोष्टींवरून जीवे मारणे म्हणजे शुल्लक बाब झालेली दिसून येते. अशातच जळगाव शहरात २८ वर्षीय युवकावर चाकूहल्ला केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सागर नरेंद्र पवार (28) असे या मृत युवकाचे नाव असून या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
नेमकी काय आहे घटना?
शहरातील समता नगर भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सागर पवार ( वय २८) हा तरूण एकटा राहत होता. रात्री उशीरा त्याच्यावर एकाने चाकूहल्ला केल्याने यात तो गंभीर जखमी झाला. त्याच्या किंचाळ्या ऐकून परिसरातील नागरिकांनी त्याला तातडीने रूग्णालयात हलविले. येथे उपचार सुरू असतांना सकाळी पाच वाजता त्याने शेवटचा श्वास घेतला.
कुणाच्या अध्यात-मध्यात नसणार्या या तरूणाच्या हत्येमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासाची चक्रे फिरवली आहे. यात एक आरोपी निष्पन्न झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, जिल्ह्यात सध्या गुन्हेगारी जी वाढती आहे ती निश्चितच पोलिसांची डोके दुखी वाढवणारी ठरू पाहत आहे.