जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जून २०२२ । भुसावळ शहरातील हुडकाेमधील म्हाडा कॉलनीतील एका ३६ वर्षीय विवाहित तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी उघडली आहे. श्रीकृष्ण उर्फ पंकज संतोष ठाकरे (वय ३६) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, आत्महत्या करण्यापूर्वी श्रीकृष्ण ठाकरे यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली आहे.
याबाबत असे की, भुसावळ येथील हुडकाेमधील म्हाडा कॉलनीतील श्रीकृष्ण ठाकरे हा त्याची पत्नी व दोन मुलांसोबत राहतो. काही वाद झाल्याने श्रीकृष्णची पत्नी माहेरी धरणगाव येथे निघून गेली होती. यानंतर श्रीकृष्णने मंगळवारी तिला फोन कॉल केला. मात्र, पत्नीने येण्यास नकार दिला. याच संतापात श्रीकृष्ण ठाकरे यांनी राहत्या घरातील किचनमध्ये बुधवारी सकाळी ७ वाजेपूर्वी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
काय लिहिले आहे सुसाईट नोटमध्ये?
आत्महत्यापुर्वी श्रीकृष्ण ठाकरे यांनी सुसाईट नोट लिहून ठेवली आहे. त्यात ‘पूजा मला मुलांनाही मारायचे हाेते. पण, मारण्याची ताकद नाही म्हणून त्यांना सोडून दिलं. कारण माझ्या ओम आणि चेतनला तू बघितलंय मी किती प्रेम करताे ते. आणि तुझ्यावर पण तेवढचं प्रेम करताे. तू मला फोनवर बोलली मी नाही येणार, म्हणूनच मी हे पाऊल उचललं आहे.’ असा उल्लेख केला आहे.
मुलाचा आईला फाेन
ठाकरे यांना चार वर्षे आणि दोन वर्षांची दोन मुले आहेत. यातील चार वर्षांच्या मुलाने रात्री १.३० वाजता फोन करून बाबा गेल्याची माहिती दिल्याचे त्याच्या आईने भुसावळ येथे आल्यावर सांगितले. तर गळफास घेतल्यानंतर वडील जणू उभेच आहेत असे समजून लहान मुलगा त्यांच्या पायाला बिलगला.