जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जुलै २०२५ । धावत्या रेल्वेखाली उडी मारून तरुण शेतकऱ्याने जीवनयात्रा संपवल्याची घटना म्हसावद रेल्वे गेटजवळ घडली. किशोर आसाराम धनगर (वय ३८, रा. डोमगाव) असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव असून या घटनेबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगावमधील डोमगाव येथे किशोर धनगर हे शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून कर्जबाजारी असल्यामुळे ते तणावाखाली होते. यावर्षी लवकर पेरणी करूनही पावसाने दडी मारल्याने दुबार पेरणीचे संकट त्यांच्यावर ओढवले होते. या आर्थिक आणि मानसिक तणावातून त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.

सोमवारी (दि.7) सकाळी किशोर धनगर यांनी राहत्या घरी जेवण करून शेतात कामासाठी गेले. मात्र काम झाल्यानंतर म्हसावद रेल्वे गेटजवळ त्यांनी धावत्या पुष्पक एक्स्प्रेसखाली उडी घेतली. घटनेची माहिती गावकऱ्यांना मिळताच, त्यांनी तत्काळ पोलिसांना कळवले. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. किशोरच्या अचानक जाण्याने परिवारावर दु:खाचे मोठे सावट पसरले आहे. गावकऱ्यांनीही हळहळ व्यक्त केली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस नाईक हेमंत जाधव पुढील तपास करत आहेत.







