जळगाव लाईव्ह न्यूज । २२ एप्रिल २०२२ । हल्ली कोण काय करेल हे सांगणे अवघड आहे. मुक्ताईनगर शहरातील एका भागात अवैध्य सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर येथील पोलिसांनी छापा टाकला असता. चक्क भावी पिढीला संस्काराचा पाठ देणारे शिक्षकच जुगार अड्डयावर पत्ते कुटत असल्याचे समोर आले आहे. यावर आपला विश्वास बसणार नाही. तथापि, येथे पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात चार मास्तरांचा समावेश असल्याने शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
अधिक माहिती अशी की, मुताईनगर शहरात अवैधरीत्या सुरू असलेल्या पत्ता जुगाराच्या क्लबवर येथील पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री साडेबारा वाजता छापा टाकला. यात १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. रोख रक्कमेसह चार दुचाकी, सात मोबाईल , जुगाराचे साहित्य मिळून एक लाख ३६ हजार ९४० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. अटकेतील आरोपींमध्ये चार शिक्षकांचाही समावेश असल्याने शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मुक्ताईनगरात आदर्श शाळेच्या रस्त्याने किशोर बोदडे यांच्या घराजवळ सार्वजनिक जागी अवैधरीत्या पत्त्याचा डावसुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक शंकर शेळके यांना मिळाली त्यानुसार त्यांनी मंगळवारी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास छापा टाकला.
यांना अटक
आकाश यशवंत सापधरे, व्यंकटेश राजेंद्र बाराहाते, महेंद्र विठोबा कोळी, विठ्ठल नागोराव मेहत्रे, निलेश कालिदास पाटील, विजय शामराव गोसावी, अशोक हरचंद सोनवणे, संदीप शिंदे, धर्मेंद्र सापधरे, अतुल रघुनाथ लोंढे, वामन बोदडे, अतुल जावरे यांना अटक करण्यात आली. या संदर्भात कॉन्स्टेबल शब्बीर तडवी यांच्या फिर्यादीवरून १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.