जी.एच.रायसोनी महाविद्यालयात नॅनो टेक्नॉलॉजीवर कार्यशाळा : डॉ. श्रीराम सोनावणे
जळगाव लाईव्ह न्यूज । २ जुलै २०२२ । जी. एच. रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयाच्यावतीने लेटेस्ट ट्रेण्ड्स इन नॅनो टेक्नॉलॉजी या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी या क्षेत्रातील तज्ज्ञ व विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेतील प्रा. डॉ. श्रीराम सोनावणे यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत महाविद्यालयाचे डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा म्हणाले की, नॅनो टेक्नॉलॉजी या अतिसूक्ष्म तंत्रज्ञानाने पुढील२५ वर्षांत मानवी जीवनात अनेक बदल घडून येणार आहेत. गेल्या दीडशे वर्षांवर प्रथम भौतिकशास्त्र, मग रसायनशास्त्र, मग इलेक्ट्रॉनिक्स, मग संगणक आणि आता नॅनो टेक्नॉलॉजी या शास्त्रांचा समाजावर प्रत्येक शास्त्राचा ३०-४० वर्षे प्रभाव होता. म्हणजेच नॅनो तंत्रज्ञानाची आता कुठे सुरुवात झालेली आहे.
आज जवळजवळ सर्व पदार्थांची, मग ते धातू असोत, अधातू असोत, अर्धवाहक असोत, काही प्लास्टिकसारखे मानवनिर्मित पदार्थ असोत त्यांची नॅनो रूपं बनवली जातात. इतकंच नाही तर हे नॅनो पदार्थ वापरून हळूहळू नॅनो औषधं, नॅनो कापड, नॅनो रंग अशा वेगवेगळ्या गोष्टीही बनविण्यास सुरुवात झाली आहे. नॅनो तंत्रज्ञान म्हणजे नुसतं हे असे वेगवेगळे पदार्थ आणि वस्तू बनवणं नाही. अगदी एकेक अणू-रेणू जोडून अतिसूक्ष्म यंत्र बनवणं हे नॅनो तंत्रज्ञानाचं अंतिम उद्दिष्ट आहे असे त्यांनी यावेळी नमूद केले. यानंतर आपल्या मार्गदर्शन कार्यक्रमात प्रा. डॉ. श्रीराम सोनावणे यांनी नमूद केले कि, मानवाच्या जीवनात आमूलाग्र बदल करणारा घटक म्हणजे नॅनो टेक्नॉलॉजी. जगातल्या प्रत्येक घटकाला नॅनो टेक्नॉलॉजीचा स्पर्श असेल. नॅनो याचा अर्थ मीटरचा एक अब्जांश भाग एखाद्या पदार्थाच्या अणुपरमाणूंच्या मांडणीचा विचार करून आपल्याला हव्या त्या गुणधर्माचे पदार्थ बनवण्याची क्षमता नॅनोटेक्नॉलॉजीचं तंत्रज्ञान देऊ शकते.
येत्या दशकात हे तंत्रज्ञान वैज्ञानिक आणि मानवी जीवनात अमुलाग्र बदल घडवून आणणार आहे. यासाठी जगभरात मोठ्या प्रमाणावर प्रयोग सुरू आहेत. रबर इण्डस्ट्रीमध्ये टायरची झीज कमी करणं, रस्त्यावरची टायरची पकड घट्ट ठेवणं अशा आवश्यक गोष्टी नॅनो मटेरियलमुळे सहज शक्य होत आहेत. नॅनो गारमेण्ट या नवीन कापडांवर धूळ कमी बसेल. जास्त तलम आणि टिकाऊ कापड मिळू शकेल. वॉशिंग मशिनच्या यंत्रावर सिल्व्हर नॅनो मटेरियलचं कोटिंग दिलं, तर कपड्यातील दमटपणा लवकर कमी होऊ शकतो. रेफ्रिजरेटरच्या अन्न टिकविण्याच्या प्रक्रियेत नॅनो टेक्नॉलॉजीचं योगदान महत्त्वाचं ठरणार आहे. संरक्षण खातं, ऊर्जा बचत, सोलार सेल यामध्येही हे तंत्रज्ञान वापरलं जाणार आहे. नॅनो मेडिसिन, नॅनो रोबोट्स यांच्या सहाय्याने वैद्यकीय शास्त्रात आमूलाग्र बदल होत आहे आणि त्याचं दृष्य स्वरूप लवकरच पाहायला मिळेल.
या टेक्नॉलॉजीमुळे होणारे बदल सर्वसामान्यांना थक्क करणारे असतील. कार्बन नॅनो ट्युब्जपासून बनवलेले धागे स्टीलच्या २० पट आणि स्पायडर सिल्कच्या चार पट मजबूत असतात. मानवी आरोग्य आणि ओझोनच्या जीवसृष्टीला वरदान असलेल्या थराला उपद्रवी ठरणारा घटक म्हणजे ऑरगॅनो हलाईड्स. परंतु, टिटॅनियम डायॉक्साइड आणि हेमिन यांच्या पातळ थरामध्ये हॅलाइडच्या विघटनाची शक्ती असल्याचं नॅनो टेक्नॉलॉजीने सिद्ध केलं आहे. जड पाण्यापासून बॅक्टेरीया आणि विषारी दव्यं वेगळी काढून शुद्ध पाणीही या टेक्नॉलॉजीमुळे मिळवता येत असल्याने ही टेक्नॉलॉजी पर्यावरण रक्षणासाठीही उपयुक्त ठरणार आहे. सिलिकॉन कार्बाइड नॅनोस्केल इलॅस्टोमरच्या वापरामुळे वाहनांच्या टायरची गुणवत्ता वाढवण्यास मदत होणार आहे. तसंच, सिलिकेटचं मिश्रण असलेल्या नॅनो मटेरियलचा वापर केलेल्या रंगांमुळे गाडीवर ओरखडे उठणं, रंग उडणं, पाणी आणि अॅसिडची प्रक्रिया होणं अशा समस्याही कायमच्या दूर होणार आहेत. निकेल ऑसिड किंवा निकेल हायड्रोजनज्या बॅटरींपेक्षा दुप्पट आयुष्य असलेली नॅनो बॅटरी भविष्यातलं वरदान ठरणार आहे.
जगात आजज्या घडीला पोस्टकार्डाच्या आकाराचा हार्ड ड्राइव्ह आहे. परंतु, नॅनोच्या मदतीने त्यापेक्षा कित्येक पटीने लहान ड्राइव्ह लवकरच तयार होणार आहे. थोड्या जागेत अमर्याद माहितीचा साठा करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स इण्डस्ट्रीत अनेक यशस्वी संशोधनांची मालिका सुरू होणार आहे असे त्यांनी यावेळी नमूद केले.
या कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा. प्रिया टेकवानी यांनी केले तर प्रा.जितेंद्र वढोद्कर, प्रा. स्वाती बाविस्कर, प्रा. तुषार वाघ, प्रा. रवींद्र बोडके, प्रा. मुकेश पाल, प्रा. डॉ. अविनाश खंबायत, प्रा. मोहित तौमर व आदींनी या कार्यक्रमाला सहकार्य केले. सदर कार्यशाळेचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी व संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी अभिनंदन केले.