कुटुंबाला ‘प्रायोरिटी’ मानणारी सूनबाई
जळगाव लाईव्ह न्यूज । महिलादिन विशेष । महानगर आणि संपन्न स्थिती असलेल्या कुटुंबातील मुली सहजपणे उच्च शिक्षण घेतात. पदवी-पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाले की, अनुभवासाठी उत्तम नोकरी मिळवतात. आव्हाने स्वीकारणारे अनुभव घेतात. बहुतेकवेळा मुलींचे उच्च शिक्षण हे विवाहानंतर अडचणीचा विषय ठरते. उद्योग-व्यवसाय-व्यापार अशात नावाजलेली वा स्थिरावलेली कुटुंबे सूनबाईच्या शिक्षणाला व अनुभवाला अनुरूप जागा देऊ शकत नाही. सासरच्या मंडळींनी शिक्षणानुसार कार्याचे स्वातंत्र्य दिले तरी विवाहिता घर, कुटुंब सांभाळण्याकडे लक्ष देतात. आयटी तंत्रज्ञानातील उच्च शिक्षण घेऊनही कुटुंबाला प्रायोरिटी समजणाऱ्या सूनबाई सौ. तृप्ती अतुल कोगटा हिचे आम्हा कोगटा परिवाराला अभिमानास्पद कौतुक आहे.
पुण्यात बीई (आयटी) शिक्षण घेतलेली तृप्ती हेडा ही आमची सून म्हणून कोगटा परिवारात यायला ११ वर्षे झाली आहेत. अतुलाचा विवाह जुळण्या अगोदर आम्ही तृप्तीला भेटलो. तेव्हा तिचे शिक्षण आणि करियर ग्राफ पाहून मी भारावलो होतो. अनुभव असा होता की, पुण्या-मुंबईतील अती उच्च शिक्षित मुली जळगावचे सासर स्वीकारायला तयार होत नाहीत. तसे ते काही अंशी बरोबर आहे. जे शिक्षण घेतले त्याच्या व्यावहारिक उपयोगासाठी जळगावात मर्यादा येतात. पण तृप्ती-अतुलचा विवाह ठरला आणि आम्ही निवांत झालो.
खरे आव्हान पुढे होते. कोगटा परिवार डाळ निर्मितीत जगविख्यात आहे. या उद्योगात आमचे ब्रैण्ड नेम आणि प्रतिष्ठा आहे. संपूर्ण उद्योग जळगाव केंद्रीत आहे. अशावेळी तृप्तीला जळगावमध्ये कशाप्रकारे सामावून घेता येईल याचा विचार सुरू होता. दाल परिवारच्या उद्योगात संगणकीय सेवा व इतर तंत्र वापर आहे. तृप्तीला तेथे गुंतवावे असे मला वाटले. ते काम कमी असेल तर जैन उद्योग समुहात आयटीशी संबंधित आव्हानात्मक कामही मिळवून देण्याचा विचार होता. परंतु तृप्तीच्या बाजूने घडले वेगळे. तिने कोणत्याही व्यावसायिक वा उद्योग व्यापात गुंतण्याऐवजी गृहिणी होणे स्वीकारले. माझी आई आणि अतुलची आई अशा दोन सासवांचा विश्वास संपादन करण्यात ती यशस्वी ठरली. आमच्या किचनमधील तिचा वावर गृहलक्ष्मीचा झाला. घरात लक्ष्मी आणावी हा विचार न करता ती स्वतःच गृहलक्ष्मी झाली. तीने आमच्या घराला एका स्नेहात बांधून टाकले.
मला नेहमी वाटते, आपण तृप्तीला काही वेगळे काम देऊ शकलो नाही. मात्र तृप्तीने तसा उल्लेख वा विचार कधीही बोलून दाखवला नाही. तृप्तीला विचारले तर ती म्हणते, ‘मी विवाह करून आले तेव्हा जळगावात आयटीसाठी पूरक फारसे वातावरण नव्हते. अपत्यप्राप्तीनंतर मी स्वतःला कुटुंबातील आदरातिथ्यात गुंतवून टाकले.’ तृप्तीचा हा अनुभव असला तरीसुद्धा तीने आता रिफ्रेश होऊन स्वतःच्या शिक्षणाचा व्यवहारात उपयोग करायला हवा.
तृप्ती बीई आहेच. शिक्षणानंतर तीने २१ महिने पुण्यातील कॉग्निझंट टेक्नॉलॉजी सोल्युशन्स या अग्रेसर कंपनीत जबाबदारीने काम केले. वाचोविया, सिमँटेक आणि इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग ॲण्ड फायनान्शियल सर्व्हिसेस आदी कंपन्यांसाठी तीने सेवा दिली. ती स्वतः रंगमंचावर अभिनय करते. पुरूषोत्तम करंडक आणि फिरोदीया करंडकमध्ये तीने अभिनय केला आहे. ती उत्तम टेबल टेनीस आणि बॉक्स क्रिकेटमध्ये पार्टनर म्हणून ही खेळते. अशा बहुगुणांनी युक्त सूनबाईला तिच्या अपेक्षेचे व्यासपीठ आपण देऊ शकलो नाही का ? असे मला वारंवार वाटते. तृप्ती मात्र गृहिणी असण्याविषयी समाधान व्यक्त करते.
(प्रेम कोगटा, जळगाव)
सौजन्य : Dilip Tiwari’s Diamond’s Group