विस्तारित कुटुंबाच्या भाभी
जळगाव लाईव्ह न्यूज । महिलादिन विशेष । आज महिलादिनी मला आईनंतर जर कोणाविषयी लिहावेसे वाटते अशा आणखी एक मान्यवर आहेत, त्या म्हणजे अनुभूती शाळा समुहाच्या संचालिका सौ. निशाभाभी जैन. पत्रकारितेत फिल्डवार असताना जैन परिवारातील निशाभाभींशी माझा जवळून संपर्क आला. प्रारंभी मला निशाभाभी मोठ्या उद्योजक कुटुंबातील व्हीआयपी असाव्यात असे वाटले होते. राहणीमान उच्चभ्रू आणि स्वाभाव रिझर्व्ह असेल असा माझा कयास होता. पण संपर्कात आल्यावर अनेक ग्रह बदलले आणि ओळख मैत्रीपर्यंत पोहचली.
जैन कुटुंबात नातेसंबंधांची घट्ट चौकट श्रद्धेय भवरलालजी आणि स्व. कांताबाईंनी घालून दिली आहे. त्यामुळे माझ्यातील आणि निशाभाभी यांच्यातील संपर्क हा कौटुंबिक होऊ शकला. जैन परिवाराच्या दोन संकल्पना आहेत. पहिली संकल्पना जैन परिवार. तो रक्ताचा असतो. उद्योगात सहभागी सहकाऱ्यांचा असतो. दुसरी संकल्पना विस्तारित जैन परिवार. यात बाहेरचे पण आपली मानलेली मंडळी आहे. निशाभाभींनी मला या विस्तारात सामावले आहे. खरे तर मी त्यांच्यासाठी फक्त न्यूज रिपाेर्टर असायला हवी हाेती. पण त्यांनी त्यापेक्षा वेगळे नाते निर्माण केले.
निशाभाभी स्वभावाने शांत आहेत. आपले काम चाेख व निर्दोषपणे करणाऱ्या आहेत. त्यांना इतरांकडूनही परफेक्ट काम हवे. ते करताना कमी बाेलणे आणि कामावर लक्ष देणे त्यांना आवडते. बोलणेही कमी पण मुद्देसूद हवे. भोवती कामांचा कितीही व्याप असला तरी त्या स्वतः प्रत्येकाकडे जातीने लक्ष देतात. हा त्यांचा विशेष गुण. मला आठवते एकदा रात्री मी अनुभूती स्कुलच्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी गेले. रात्री उशीर झाला. तेथून व प्रेसला जाऊन मला बातमी द्यायची हाेती. निशाभाभींना हे माहिती हाेते. त्यांनी कार्यक्रम संपल्यावर माझा हात धरुन जेवणाच्या ठिकाणी नेले. मला जायची घाई होती. त्या पट्कन म्हणाल्या, ‘यामिनी टीफिन घेऊन जा !’. निशाभाभी बोलून नाही थांबल्या. त्यांनी टीफिन भरायला लावला. टीफिन देऊनच त्यांनी मला निरोप दिला. मला निशाभाभींच्या स्वभावातला आणखी एक गुण आवडतो. तो म्हणजे, कधीही कॉल केला तर त्या म्हणताता, ‘हा बाेला यामिनी…’ त्या माझ्या मेसेजला प्रतिसाद देतात. असे असले तरी निशाभाभी प्रसिद्धीपासून कायम दूर असतात. एवढी अटैचमेंट विस्तारित कुटुंबातील मला मिळत असली तरी मला आनंद आहे.
(यामिनी कुळकर्णी, जळगाव)
सौजन्य : Dilip Tiwari’s Diamond’s Group