जळगाव लाईव्ह न्यूज । प्रज्वली नाईक । समाजात जगताना महिलेतल्या ताकदीचे बळ हे तिची कृती बरंच काही खुणावत असते. ती कळत-नकळतपणे घडत असते आणि घडवत असते या जगण्यातले जीवनपैलू… हर्षाली चौधरी या अशाच स्वतःच्या अनुभवातून घडत गेल्या आणि आता कित्येक लेकरांची माय…ममतेची सावली झाल्या आहेत. आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने जाणूया त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास…
घरची परिस्थिती अत्यंत सुखकर, शैक्षणिक वातावरण, सामाजिक पाठिंबा हे सारं असताना देखील हर्षाली ताई अहोरात्र झटत आहेत दिव्यांग मुलांच्या अस्तित्वासाठी…त्यांच्या शिक्षणासाठी… त्यांच्या मुलगाला लहानपणी मेडिकल त्रूटीमुळे अचानक अपंगत्व आले. पण त्या अचानक आलेल्या संकटावर त्या घाबरल्या नाहीत की मुलाला दोष देऊन दूर झाल्या नाहीत. पुरेपूर वैद्यकीय उपचार करत त्यांनी मुलाला सक्षम बनविण्यासाठी प्रशिक्षण पण घेतली.
काय मानसिक अवस्था असेल? पायाखालची जमीन सरकलेली असेल की मनात गोंधळ असेल? माणूस म्हणून जगताना या सगळ्या भावना, व्यथा त्या देखील सोसत असतील. पण त्यानी कुटुंबाला दोष दिला नाही. स्वतः हॉटेल मॅनेजमेंटमध्ये तज्ज्ञ असणाऱ्या ताईने… मुलासाठी मानसशास्त्र विषयात पदवी देखील घेतली. एवढेच नव्हे तर स्पेशल चाईल्ड असणाऱ्या या मुलांना प्रशिक्षण कसे द्यावे…घडवावे कसे याचे देखील पुरेपूर शिक्षण घेतले.
मग यातून त्यांचा प्रवास आकाशातील उडान सुटले ते अजूनही आसमंत व्यापून टाकणारं ठरतं आहे. याच संकल्पनेतून जळगावमध्ये उडान दिव्यांग प्रशिक्षण संस्था उभी राहिली. कोणताही मोबदला न घेता…ही सामाजिक संस्था दिव्यांग मुलांना त्यांच्या पंखांना बळ देत आहे. एवढेच नाहीतर दिव्यांग, मतिमंद आणि गतिमंद अशा मुलांना शिक्षणासोबतच कलाकौशल्य, रोजगार निर्मिती देखील उपलब्ध करून देत आहे. ही मुले यातूनच सावरत आपली नव्याने ओळख निर्माण करतात.
यामध्ये पालकांचा कितपत पाठिंबा असतो? हे विचारल्यावर हर्षाली ताई म्हणतात की, “कित्येक पालकांना अशी मुले नको असतात. त्यामुळे आम्ही पालकांचे देखील समुपदेशन करतो. कारण त्यांनी स्वीकारणं ही काळाची गरज आहे.” ही हर्षाली ताईंची धडपड तेवढ्यापुरती मर्यादित राहत नाहीतर त्यांनी अनेक महिलांना यात समावून घेऊन गतिमंद, दिव्यांग मुलांना स्वावलंबी बनविण्यासाठी तयार करत आहेत.
ही मुले देखील या सगळ्यातून जाताना चांगला प्रतिसाद देतात. काही जण पणत्या, कंदील,राख्या आणि गणेशोत्सवानिमित्त साहित्य बनवतात, तर काही खाद्य पदार्थ बनविण्यात रमतात. किती सुखद भावना असेल….जसा मातीच्या गोळ्याला आकार दिल्यावर एक सुंदर शिल्प तयार होतं ना. तसंच ते मुलांच्या अस्तित्वाचे रेखाटन करतात. त्यांच्या या कामाला जळगाव लाईव्हचा मनापासून सलाम !