सोन्याच्या प्रभावळीत वैद्यकीय सेवेचा वसा
जळगाव लाईव्ह न्यूज । महिलादिन विशेष । संपूर्ण महाराष्ट्रात जळगावाच्या सोने दागिने विक्रीत राजमल लखीचंद ज्वेलर्सचा सन १८५४ पासून नावलौकिक आहे. याच व्यवसायातील विस्तारित नवी सेवा आर. ज्वेल्स (राजमल लखीचंद मनीष जैन ग्रुप) नावाने आहे. ईश्वरलाल जैन नातू तथा पुत्र मनिष जैन यांचे चिरंजीव राजऐश्वर्य जैन यांनी पारंपरिक शोरूम व्यवसायाला आॕनलाईन शॉपिंगचा चेहरा-मोहरा दिला आहे. व्यवसायातील या वृद्धीसह आरएल गृप आता वैद्यकीय सेवा देण्यासाठी पुढे सरसावला आहे. जैन कुटुंबातील चौथ्या पिढीतील राजऐश्वर्य जैन आणि त्यांच्या पत्नी सौ. आरसी जैन यांनी सोन्याच्या प्रभावळीत वैद्यकीय सेवेचा वसा घेतला आहे. या नव्या क्षेत्रात विस्ताराची जबाबदारी आरसी जैन यांनी घेतली आहे. जवळपास ८ महिन्यांपूर्वी आरएल हॉस्पिटल सेवा सुरू झाली होती. त्याची सूत्रे आता आरसी जैन यांच्याकडे आहेत.
आरसी जैन या मानसशास्त्रीय रोग निवारण तज्ञ आहेत. त्यांचे पदवी व पदव्युत्तर शिक्षण समाजशास्त्र आणि मानसशास्त्र विषयात झालेले आहे. मूळच्या कोटा (राजस्थान) मधील आरसी यांचे शिक्षण दिल्लीत झाले. शिक्षणानंतर त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात मानसशास्त्रीय रूग्णांसाठी समुपदेशक होण्याचे कार्य स्वीकारले. साधारणतः सन २०११ पासून त्यांनी दिल्लीलगतच्या नोएडा परिसरातील अपोलो हॉस्पिटलमध्ये सेवा देणे सुरू केले. बदलत्या काळात शरीराशी संबंधित आजारांचे प्रमाण वाढत असताना मानवाच्या मानसशास्त्रीय आरोग्यातही बिघाड होण्याचे प्रमाण वाढते आहे. अशा आजारांवर गोळ्या-औषधांचा फार मोठा खर्च रूग्णाला होतो. एवढे करूनही आजारातून पूर्णतः बाहेर येता येईल याची शाश्वती नाही. अशा रूग्णांसाठी आरसी जैन यांनी १० वर्षांच्या अनुभवातून खास उपचार पद्धती शोधली आहे. कमी औषधांचा वापर, शारीरिक संतुलनासाठी आहार आणि व्यायाम तथा योगाचा वापर करीत रूग्णांना पूर्णतः रोगमुक्त करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. आरसी म्हणतात, ‘मी आतापर्यंत ७५० पेक्षा जास्त मानसिक विकारातील गांभीर रूग्णांना पूर्ववत बरे केले आहे.’
आरसी जैन यांचे कार्य वैद्यकीय सेवेशी निगडीत आहे. मानसिकदृष्ट्या खचलेल्या वा विमनस्क रूग्णांना त्या समुपदेशन करतात. बदलत्या काळात व्यापार, उद्योग, व्यवसाय, नोकरी वा रोजगार तसेच कौटुंबिक समस्यांनीग्रस्त रूग्णांची चिंता, नैराश्य, तणाव, कुटुंबातील ताण-तणाव यावर त्या उपचार करतात. विवाहपूर्व वर-वधू आणि पालकांना मार्गदर्शन करतात. अमली पदार्थांचे सेवन आणि इतर व्यसन मुक्तीसाठीही उपचार करतात. अभ्यासात मुला-मुलींचे लक्ष लागावे, एकाग्रता वाढावी यासाठी समुपदेशन करतात. अशा विविध सेवांचा उत्तम अनुभव असलेल्या आरसी स्वतःच्या कार्याविषयी सतर्क आणि ठाम आहेत. जळगाव सारख्या ठिकाणी मानसोपचारातील अद्ययावत सेवा व उपचार पद्धती देऊन युवा वर्गातील आजार कमी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आरएल हॉस्पिटलला उपचाराचे परिपूर्ण बहुउपचार केंद्र करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. तेथे फिजीएशन, लहान मुलांचे आजार, जनरल सर्जन, महिलांचे आजार यासह मानसिक विकारावरील उपचाराच्या अत्याधुनिक सेवा त्या उपलब्ध करून देत आहेत. आजारांवरील शस्त्रक्रियांसाठी असलेल्या सरकारी अनुदानित योजनांचा लाभही मिळतो आहे.
आरसी या आरोग्य सेवेत नवा प्रयोग करीत आहेत. यासाठी आजे सासरे ईश्वरलालजी, सासरे मनिषजी आणि पती राजऐश्वर्य यांचे पूर्णतः पाठबळ लाभले आहे. इंटरनेटवरील व्हिडिओ कॉन्फरन्स सेवेच्या माध्यमातून थेट कजागिस्तानमधील आरोग्यविषयक उपक्रमात त्या सहभागी होत आहेत. इन्टाग्राम, फेसबूक या सोशल मीडियातील व्यासपिठांवरही अर्शी जैन समुपदेशनासाठी उपलब्ध असतात. जळगावची एक सून नव्या क्षेत्रातील भरारीला सज्ज होत आहे.
सौजन्य : Dilip Tiwari’s Diamond’s Group