स्वतःचे क्लिनीक सुरू करून द्यायचे आहे
जळगाव लाईव्ह न्यूज । महिलादिन विशेष । अमृताशी विवाहाला सात वर्षे होत आहेत. माझ्या सरकारी आणि सतत बदलीच्या सेवेमुळे अमृता यांच्या करियरविषयी आम्ही अद्याप ठोस निर्णय घेऊ शकलेलो नाही. या सात वर्षांत दोन अपत्यांचे समाधानी पालक होण्याचा आनंद आम्ही घेत आहोत. शिवाय, अमृता यांनीही गृहिणी सौख्यासह उत्तम माता होण्याचा योग साधला आहे.
महिलादिन निमित्त अमृताविषयी लिहायचा आग्रह मी मोडू शकलो नाही. शांतपणे मागे वळून पाहिले तर मला जाणवले कुठे तरी अमृताच्या करियरचा एक कप्पा अजून भरायचा आहे. ती मूळची पुण्याची आहे. महाराष्ट्रातील विद्यानगरीतील. तिचे शिक्षण एमआयएमईआर मेडिकल कॉलेज (तळेगाव, पुणे) येथून एमबीबीएस (२००७/१३) एमडी (स्किन) (२०१४/१७) सलग आणि गुणवत्तेने पूर्ण झाले. तिचे शिक्षण सुरू असताना सन २०१५ मध्ये आमचा विवाह झाला. तेव्हा ती एमडी स्किन करीत होती. लग्नानंतर २ वर्षांनी तीचे शिक्षण पूर्ण झाले.
थोडे घाईने का असे ना पण आम्ही दोन अपत्यांचा चान्स लागोपाठ घेतला. सन २०१८ देवयानी आणि सन २०२० दिग्विजय. खरे तर हा आनंदही खूप सुखावणारा आहे. कौटुंबिक-मुलांच्या जबाबदाऱ्यांमुळे अमृताला वैद्यकीय सेवेचा सराव करता आला नाही. काही काळ तिने जळगाव पोलीस रुग्णालयात सेवा दिली. पण कुटुंबाची काळजी घेण्यासाठी तिने सेवेचा अद्याप व्यवसाय केलेला नाही. हे आम्ही दोघांनी अत्यंत सामंजस्याने व संयमाने ठरविले आहे.
एक गोष्ट मी नक्कीच सांगेन. अमृताने पूर्ण क्लिनिकल प्रॅक्टिस करावी अशी माझी इच्छा आहे. सध्या त्यात काही काळ मुलांच्या वाढीला देणे भाग आहे. पोलीस विभागात सध्यातरी दर दोन-तीन वर्षांनी वारंवार बदली आहे. अशा स्थितीत स्थिर असे क्लिनिकल कार्य होऊ शकत नाही. पण सरकारी यंत्रणेतीला रूग्णसेवेत सहभागी होता येते. काही कालावधी नंतर अमृताला करियरिस्ट वुमेन म्हणून पाहायला मलाही आवडणार आहे …
(डॉ. प्रवीण मुंढे, एसपी, जळगाव जिल्हा)
सौजन्य : Dilip Tiwari’s Diamond’s Group