जळगाव लाईव्ह न्यूज । ०१ जून २०२१ । महिला आर्थिक विकास महामंडळ, जळगाव, जिल्हा नियोजन विभाग, जळगाव यांच्यामार्फत मानव विकास मिशन कार्यक्रम जिल्ह्यातील मुक्ताईनगर, एरंडोल, जामनेर या तीन तालुक्यातील राबविला जात आहे.
या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील बचत गटातील महिलांसाठी कार्यरत लोक संकलीत साधन केंद्राच्या माध्यमातून या तालुक्यात कापडी पिशवी युनिट सुरु करण्यात आले आहेत. या कार्यक्रमांतर्गत युनिटला इंडस्ट्रियल मशीन, कापड कटींग मशीन, स्क्रीन प्रिंटिंग मशीनचा पुरवठा करण्यात आला आहे.
कोरोनाच्या काळात जिल्ह्यातील बचत गटातील महिलांना रोजगार व काम मिळावे, या उद्देशाने महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे यांच्या मदतीने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुंबई यांच्याकडून या युनिटला काम देण्यात आले असून त्यांच्याकडून वीस हजार कापडी पिशवी शिवून घेतल्या जाणार आहे.
जिल्ह्यातील मुक्ताईनगर, एरंडोल व जामनेर या ती युनिटमधील 90 महिलांकडून या पिशव्या शिवून घेण्यात येणार आहे. या कामाचा शुभारंभ बौद्धपौर्णिमेच्या दिवशी कोरोनाचे नियम पाळून या महिलांनी आपआपल्या युनिटमध्ये करुन कामास सुरुवात केली. या महिलांना एका पिशवीसाठी चार रुपये प्रति पिशवी इतका मेहताना मिळणार असून लॉकडाऊन व कोरोनाच्या काळात त्यांना घरातच काम उपलब्ध झाल्याने रोजगार मिळणार असल्याने या महिलांनी आनंद व्यक्त केला.
मानव विकास मिशन कार्यक्रमातंर्गत जिल्ह्यातील तीनही युनिट लवकरात लवकर सुरू करता यावे, याकरीता जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा नियोजन विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांची मदत मिळाली असून जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे-खेवलकर यांचीही वेळोवेळी मदत व मार्गदर्शन लाभल्याचे महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी शेख अतिक यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.