जळगाव लाईव्ह न्यूज । सध्या जळगाव जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. यात अनेकदा बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेऊन चोरटे अंगावरील सोन्याचे दागिने, पर्स, मोबाईल आणि रोख रक्कम चोरत असल्याच्या घटना सातत्यानं समोर येत आहेत. आता अशीच एक घटना समोर आलीय. भुसावळ येथून यावलला येणाऱ्या बसमध्ये चिखली बुद्रुक येथील २८ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत चोरी झाली. हा प्रकार अंजाळे जवळ उघडकीस आला. चालकाने अंजाळे येथून बस थेट यावल पोलिस ठाण्यात आणली. तेथे प्रवाशांची झडती घेण्यात आली. चार जणांवर संशय असून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
यावल आगाराची एसटी बस (क्रमांक एमएच.२०-बीएल.२७१४) भुसावळ येथून यावलला जात असताना भुसावळ येथून शुभांगी लोमेश सावळे (वय २८, रा. चिखली बुद्रुक ता.यावल) ही महिला बसली होती. त्या अंजाळे येथे उतरणार होत्या. मात्र, त्यांच्या गळ्यातील तीन ग्रॅम सोन्याची पेंडल व मोती असलेली पोत चोरीला गेली. शुभांगी सावळे अंजाळे बस स्थानकावर उतरत असताना ही पोत चोरी झाल्याचे लक्षात आले.

त्यांनी हा प्रकार चालक आणि वाहकास सांगितला. यानंतर तेथून एसटी बस सरळ यावल पोलिस ठाण्यात नेण्यात आली. बसमध्ये ५० हून अधिक प्रवासी होते. पैकी दोन महिला आणि दोन पुरुष अशा चौघांवर संशय होता. यावल पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. यानंतर बस रवाना करण्यात आली.







