⁠ 
शनिवार, मे 4, 2024

जळगावात गळ्यातील स्कार्फमुळे गेला महिलेचा जीव ; नेमकं काय घडलं?

जळगाव लाईव्ह न्यूज ।13 मार्च 2024 । जळगावातील एमआयडीसी (MIDC) परिसरातून एक दुर्दैवी घटना समोर आलीय. महिलेच्या गळ्यात असलेल्या स्कार्फने क्षणार्धात होत्याचे नव्हते केलं. डाळीच्या मशीनमध्ये स्कार्फ अडकल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सरस्वती गोविंदा ठाकरे असं या महिलेचे नाव आहे.

घरची परिस्थिती हलाकीची असल्याने पती- पत्नी दोघेजण सोबत जळगाव एमआयडीसी (MIDC) परिसरातील व्ही-सेक्टरमध्ये असलेल्या दालमिलमध्ये दोन वर्षांपासून काम करत होते. दरम्यान १२ मार्चला नेहमीप्रमाणे पनीत काम करत असताना गोविंद याने पत्नी सरस्वतीला वर जाऊन दालमील यंत्रासाठी आवश्यक आद्रतेनुसार थोडे पाणी व पावडर टाकण्यास सांगितले. यानंतर मशिन सुरु केले. सरस्वती मशिनमध्ये डाळ टाकत असताना गळ्यात बांधलेला स्कार्फ मशिनच्या पट्ट्यात ओढला गेला. गळ्यातील स्कार्फसह सरस्वती ओढली जाऊन तिचे शीर धडावेगळे झाले.

मशिनजवळ जोरदार आवाज झाला. काय झाले म्हणून गोविंद हा वर धावत गेला. यावेळी समोरचे दृश्‍य पाहून तो जमिनीवर कोसळला. आपल्यासोबत जेवण करून काम करणारी पत्नीचे धड एकीकडे तर, मुंडके दुसऱ्या बाजूला पडलेले पाहून गोविंदला काय करावे सुचत नव्हते. यानंतर दालमिलमधील इतर कामगारांनी धाव घेतली. घटनेची माहिती कळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.