अरे वा! जळगाव ते पुणे प्रवास फक्त ३ तासांत होणार, जाणून घ्या नवीन महामार्गाचा संपूर्ण प्लॅन..

डिसेंबर 16, 2025 12:50 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावसह खान्देशातील नागरिकांसाठी दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे पुणे ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान नवीन एक्सप्रेस हायवे (उच्चगती महामार्ग) तयार करण्यात येणार असून, या महामार्गामुळे जळगाव ते पुणे प्रवास अवघ्या 3 तासांत पूर्ण होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.

highway

महाराष्ट्राच्या दळणवळणाच्या सुविधेत क्रांतिकारक बदल घडवून आणणारी महत्त्वपूर्ण घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली असून पुणे आणि छत्रपती संभाजीनगर या दोन शहरांना जोडणारा अत्याधुनिक, एक्स्प्रेस हायवे (उच्चगती महामार्ग) उभारण्यात येणार असल्याची घोषणा नितीन गडकरी यांनी केली आहे. पुणे-छत्रपती संभाजीनगर उच्चगती महामार्गासाठी १६ हजार ३१८ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा महामार्ग अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उभारण्यात येणार आहे. यात उच्च दर्जाचे रस्ते, आधुनिक पूल, उड्डाणपूल, सेवा रस्ते तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करण्यात येतील.

सध्या पुण्याहून छत्रपती संभाजीनगर येथे पोहोचण्यासाठी सहा ते साडेसहा तासांचा कालावधी लागतो. मात्र, प्रस्तावित उच्चगती महामार्ग पूर्णत्वास आल्यानंतर पुणे-छत्रपती संभाजीनगर अंतर अवघ्या दोन तासांत पार करता येईल, असा दावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे.

दुसरीकडे नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाला जळगाव जोडण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या उपस्थितीत घेण्यात आलाय. जळगाव ते छत्रपती संभाजीनगर दरम्यानच्या महामार्गाला गती देताना जळगावहून मुंबई आणि पुण्याला कमी वेळेत कसे पोहोचता येईल, याबाबत चर्चा झालीय. सध्या अजिंठा, सिल्लोडमार्गे जळगावहून छत्रपती संभाजीनगरला पोहोचण्यासाठी अडीच तासाचा प्रवास करावा लागतो. हा रस्ता समृद्धी महामार्गाशी जोडण्यापूर्वी जळगाव ते छत्रपती संभाजीनगर दरम्यानचा प्रवास अवघ्या एक तासावर आणण्याचे ठरलंय.

जळगाव-छत्रपती संभाजीनगर दरम्यानचा प्रवासासाठी एक तास आणि पुढे छत्रपती संभाजीनगर ते पुणे उच्चगती महामार्गावरील प्रवासाचे २ तास गृहीत धरले तर अवघ्या तीन तासांत जळगावहून पुण्याला पोहोचणं शक्य होणार आहे.

खरंतर जळगावसह खान्देशातून शिक्षण, नोकरी, उद्योगधंदे आणि व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणावर लोक पुण्याला ये-जा करतात. दरम्यान, हा नवीन एक्सप्रेस हायवे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर जळगाव, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे यांच्यातील अंतर मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे. या प्रकल्पामुळे केवळ दळणवळण सुलभ होणार नाही, तर महाराष्ट्राच्या औद्योगिक, व्यापारी आणि सामाजिक विकासालाही मोठी चालना मिळणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now