जळगाव लाईव्ह न्यूज । २३ डिसेंबर २०२१ । राज्याच्या हिवाळी अधिवेशनात पाचोरा-भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर पाटील यांनी भडगाव तालुक्यात गेल्या फेब्रुवारीत झालेल्या २ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावरील केळीच्या नुकसान भरपाईचा प्रश्न उपस्थित केला. विमा कंपन्यांनी अद्याप शेतकऱ्यांना भरपाई न दिल्याने रोष व्यक्त करून राज्य शासन त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

राज्याचे हिवाळी अधिवेशन बुधवारपासून सुरु झाले आहे. यावेळी आमदार किशोर पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात गेल्या जुलै महिन्यात जिल्ह्यातील चोपडा, यावल येथे जोरदार वादळ व अतिवृष्टीमुळे केळीचे नुकसान झाले, त्या दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली. मात्र त्याच महिन्यात ७ रोजी भडगाव तालुक्यात अतिवृष्टी होऊन अडीच हजार हेक्टर क्षेत्रातील केळी पिकाचे नुकसान झाले.

या बाबत शासनाचे कर्मचारी ग्रामसेवक, तलाठी व कृषी सहायक हे पंचनामे करतात. मात्र विमा कंपनीचे यंत्र हैद्राबादला आहे. वारावादळ, गारपीट झाल्याचा संदेश हा कंपनीकडे जात नाही. त्यांचा शासनाच्या कर्मचाऱ्यांवर विश्वास नाही का? अशी विचारणा केली. कृषी मंत्री दादा भुसे यांनीही या भूमिकेवर सहमती दर्शवली.











