नागरिकांचा जीव गेला की येईल का मनपाला जाग?
जळगाव लाईव्ह न्यूज | १४ सप्टेंबर २०२२ | जळगाव शहरामध्ये किती समस्या आहेत हे आता नागरिकांना सांगण्याची गरज उरलेली नाही. कारण समस्यांचे घर म्हणजे जळगाव शहर म्हटलं तर काही वावग ठरणार नाही. रस्ता, गटार, अस्वच्छ पाणी अशा सर्वच समस्यांनी जळगाव शहरातील नागरिक त्रासले आहेत. यातच अजून एका ठिकाणी महानगरपालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष पाहायला मिळत आहे.
जळगाव शहरातले पिंप्राळा रेल्वे गेट कायमस्वरूपी वाहतुकीसाठी बंद करण्यात आलं असल्यामुळे आणि कोर्ट चौकामध्ये गटारीचे काम सुरू असल्यामुळे मुख्य रस्त्यावरून कोणतेही वाहतूक होत नाहीये. अशावेळी सर्व वाहतूक ही परिसरातील पर्यायी रस्त्यावरून केली जात आहे.यातच त्या पर्यायी रस्त्यावर असलेला एक तुटलेल्या गरीकडे मनपा तर्फे अजूनही दुर्लक्ष होत असून ती बुजवण्यात आलेलं नाहीये.
गेल्या काही दिवसांपासून या तुटलेल्या गटारीमुळे दोन नागरिकांचा अपघात झाला आहे. रात्रीच्या वेळेस या ठिकाणी लाईट देखील नसतात, यामुळे अंधारात हि तुटलेली गटार दिसत नाही. अशावेळी मनपा प्रशासन याकडे अक्षम्य दुर्लक्ष करत असून येत्या काळात या ठिकाणी एखाद्या नागरिकाला गंभीर दुखापत देखील होऊ शकते.
गोविंदा रिक्षा स्टॉप कडून शाहूनगर कडे येणाऱ्या पहिल्याच वळणावर हि तुटलेली गटार आहे. मात्र याकडे मनपा लक्ष देण्यासाठी तयार नाहीये. मनपा प्रशासन या बाबीला गांभीर्याने घेत नसल्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास व्हायला लागला आहे. येत्या काळात एखाद्याला गंभीर दुखापत झाली किंबहुना व्यक्तीचा मृत्यू झाला तरच मनपाला जाग येणार आहे का? असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.