सोमवार, डिसेंबर 11, 2023

आ. एकनाथराव खडसे होणार विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते ?

जळगाव लाईव्ह न्यूज । २० जून २०२३ । शिवसेना नाव आणि शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह दोन्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले. यामुळे ठाकरे गटाची गळती कमी व्हायला तयार नाहीये. यातच आता विधानपरीषद आमदार मनिशा कायंदे शिवसेनेत गेल्याने आता विधानपरिषदेतील ठाकरे गटाचा एक आमदार कमी झाला आहे.

यामुळे आता ठाकरे गटाचे विरोधीपक्ष नेतेपद सुद्धा जाईल अश्या चर्चा रंगू लागल्या आहेत. यातच अंबादास दानवे यांचे विधानपरिषद विरोधी पक्षनेते पद गेले कि त्यांच्या जागी राष्ट्र्रवादी काँग्रेस दावा करेल असे म्हटले जात आहे. जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री आ.एकनाथराव खडसे यांना मिळू शकते.(Eknathrao Khadse Leader of the Opposition)

विधान परिषदेच्या सभागृहात शिवसेना ठाकरे गटाची सदस्यसंख्या १० एवढी होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सदस्यसंख्या ९ होती. मात्र ठाकरे गटाकडून वरच्या सभागृहात आमदार असणाऱ्या मनिषा कायंद यांनी शिंदे गटाची वाट धरल्यामुळे ठाकरेंची सदस्यसंख्या ९ झाली आहे . यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची सदस्यसंख्या समसमान झाली आहे.

अश्या वेळी दानवेंकडे असलेले विरोधीपक्षनेते पद राष्ट्रवादीचे विधान परिषद सदस्य एकनाथ खडसे यांना द्यावं, अशी मागणी राष्ट्रवादीचे विधान परिषद आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे.

अंबादास दानवे यांचा अभ्यास कमी आहे, असं कुठेही मी म्हंटलं नाही. जर समजा महाविकास आघाडीने ठरवलं की, विरोधी पक्षनेते पदासाठी शिवसेनेकडे ९ सदस्य आहेत. शिवसेनेकडे अनिल परब अभ्यासू आहेत, तर आमच्याकडे एकनाथ खडसे हे अनुभवी नेते आहेत. भाजपचा सामना करायचा असेल तर अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून खडसेंकडे पाहायला हवे अशी माझी भावना असल्याचे ते म्हणाले.