⁠ 
मंगळवार, डिसेंबर 3, 2024
Home | कृषी | कापसाचे दर वाढतील का कमी होतील? असा आहे तज्ञांचा अंदाज

कापसाचे दर वाढतील का कमी होतील? असा आहे तज्ञांचा अंदाज

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | २३ जानेवारी २०२३ | यंदा कापसाला (Cotton) मुहूर्तावर निघालेला १० ते १२ हजारांचा भाव तसेच मागीलवर्षी मिळालेल्या १२ ते १३ हजारांच्या भावामुळे कापूस उत्पादकांना चांगल्या भावाची अपेक्षा लागली होती. असे असतानाच डिसेंबरमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडींमुळे कापसाच्या दरात सुमारे तीन ते साडेतीन हजारांची घट झाली आहे. कापसाला किमान १० हजार किंवा त्यापेक्षा अधिक भाव मिळावा, अशी अपेक्षा असतांना सध्या बाजारात ८५०० पर्यंत भाव मिळत आहे. पुढील काही दिवसांत पुन्हा दहा हजारांपुढे भाव मिळेल, या आशेने शेतकर्‍यांनी कापूस घरातच साठवला आहे. त्यातच सध्या बाजारातील आवक जास्त असून दर वाढणार नाहीत, कापूस दरात आणखी घसरण होईल, अशा अफवाही काहीजण पसरवत आहेत. यामुळे कापसाचे दर वाढतील का कमी होतील? या संभ्रमात शेतकरी अडकले आहेत.

कापसाला मागील वर्षी १२ ते १३ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला होता. तो यंदाही मिळेल, या अपेक्षेने शेतकरी बाजारात कापूस आणत नसल्याचे चित्र आहे. परिणामी अजूनही ८० ते ९० टक्के कापूस शेतकर्‍यांच्या घरातच आहे. असे असताना, कापसाच्या दरात तब्बल एक हजारांची घसरण झाली. यामुळे कापूस उत्पादक शेतकर्‍यांची कापूस दराबाबतची चिंता आणखी वाढली आहे. मागील आठवड्यात कापसाला सरासरी ८ हजार ४०० ते ९ हजार रुपये दर मिळत होता. पण त्यानंतर दरात नरमाई येत गेली. पण जाणकारांच्या मते, कापूस दरात जास्त घसरण होणार नाही. पुढील आठवडाभरानंतर कापूस दरात सुधारणा दिसू शकते, असा अंदाज आहे. चालू आठवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर वाढले. मात्र देशातील दर नरमलेल्या पातळीवर कायम होते. पण पुढील काळात कापूस दरात सुधारणा दिसू शकते. देशातील दरपातळी ८ हजार ५०० ते ९ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान राहू शकते. त्यामुळं शेतकर्‍यांनी ८ हजार ५०० रुपयांपेक्षा कमी दरात कापूस विक्री करु नये, असं आवाहन कापूस बाजारातील अभ्यासकांनी केलंय.

या विषयी बोलतांना कृषीतज्ञ तथा अ‍ॅग्रोवर्ल्डचे संचालक शैलेंद्र चव्हाण म्हणाले की, जर कापसाची लागवड व उत्पादन याची जागतिक आकडेवारीवर नजर टाकल्यास, लक्षात येते की, यावर्षी जगभरात सुमारे २० लाख हेक्टर क्षेत्रफळावर कापसाची लागवड जास्त झाली. यामुळे सुमारे ३६० लाख गाठींचे उत्पादन होणे अपेक्षित होते मात्र प्रत्यक्षात ३०० लाख गाठींचे उत्पादन झाले. याचा अर्थ ६० लाख गाठींचा तुटवडा आहे. यामुळे गेल्यावर्षा प्रमाणे यंदाही कापसाला विक्रमी दर मिळेल, अशी अपेक्षा शेतकर्‍यांना लागून आहे. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापूस व कापड उद्योग मागील वर्षाचे उत्पादन शिल्लक असल्याने यंदा कापसाचे दर विक्रमी पातळीवर जाण्याची शक्यता तशी कमीच आहे. यामुळे शेतकर्‍यांनी ८ ते १० दरम्यान दर मिळाल्यास दोन-तीन टप्प्यात विक्री करण्यास हरकत नाही, असा सल्ला देखील शैलेंद्र चव्हाण यांनी दिला आहे.

कापसाअभावी जिनिंग व्यवसाय धोक्यात
कापसाला १० ते १३ हजारांचा दर मिळेल, तेव्हा कापूस विकू, अशी शेतकर्‍यांची भूमिका आहे. यामुळे शेतकर्‍यांनी घरात कापूस साठवून ठेवला आहे. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाच्या गाठींना हव्या त्या प्रमाणात मागणी नाही. याचा विपरित परिणाम जिनिंग व्यवसायावर होत आहे. जळगाव जिल्ह्याच्या बाबतीत बोलयाचे म्हटल्यास, जिल्ह्यात कापूसटंचाई निर्माण झाल्याने जिल्ह्यातील दीडशेपैकी केवळ ७५ जिनिंग प्रेसिंग मिल्स सुरू होत्या. आता त्यातील ५० जिनिंग बंद झाल्या आहेत, तर २५ जिनिंग बंद होण्याच्या मार्गावर आहेत. कापसाच्या गाठींना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी नाही. त्यामुळे गाठी तयार करून कोणाला विकणार, असा प्रश्न जिनिंग चालकांना पडला आहे. एकंदरित बाजारपेठेत कापूस विक्रीसाठी येणे बंद झाल्याने कापसाअभावी जिनिंग व्यवसाय धोक्यात आला आहे.

गेल्यावर्षी चांगल्या दराची ही होती कारणे
कापसाला गेल्या वर्षी मार्च महिन्यात १३ हजारांचा दर मिळाला होता. मागील वर्षी कापसाचे उत्पादन चांगले होते. मात्र, अतिवृष्टीने कापसाचे नुकसान अधिक झाले. बाजारपेठेत कापूसच नव्हता. आंतरराष्ट्रीय स्तरावर कापसाला अधिक मागणी होती. यामुळे व्यापार्‍यांनी कापसाला चांगला भाव दिला. सध्या आंतरराष्ट्रीयस्तरावर कापसाला मागणी कमी झाली आहे. यामुळे व्यापारी जादा भाव सध्या देऊ शकत नसल्याचे चित्र आहे. मार्च महिन्यात आंतराष्ट्रीय स्तरावर कापसाची मागणी वाढेल, खंडीचे दर वाढतील, पर्यायी व्यापार्‍यांना कापसाला चांगला दर द्यावा लागेल, अशी आशा शेतकर्‍यांना आहे.

author avatar
डॉ. युवराज परदेशी
पत्रकारिता क्षेत्रात गत १८ वर्षांपासून कार्यरत. कॉर्पोरेट कम्युनिकेशन व लॉबिंग या विषयावर पीएच.डी.चे संशोधन. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. तीन पुस्तके प्रकाशित. दैनिक लोकसत्ता, दैनिक देशदूत मधील कामासह महाराष्ट्र विधीमंडळ वार्तांकनाचा दीर्घ अनुभव. दैनिक जनशक्तीचे माजी निवासी संपादक.