मोदींच्या फोटोला काळे फासणाऱ्या सत्यजित तांबेंना भाजप देणार पाठिंबा?
जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जानेवारी २०२३ । राजकारण म्हटलं की काही ना काही होत असतं. राजकारणात काहीही अशक्य नसतं. राजकारणात कोणीही कोणाच कायमच शत्रू किंवा मित्र नसत. अशा प्रकारची कित्येक वाक्य किंबहुना घोषणा आपण आजवर ऐकत आलो आहोत. याचा प्रत्यय कित्येकदा आपल्याला आपल्या आयुष्यात आला आहे. मात्र नाशिक शिक्षण विधानपरीषद मतदारसंघाच्या निवडणुकीत आता याचा अजून एक प्रत्यय मिळू शकतो असं म्हटल जात आहे.
तर झालं असं की, नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या सस्पेन्स गुरुवारी संध्याकाळी संपला. यावेळी काँग्रेस उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांनी अखेरचा क्षणी माघार घेतली आणि सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. हे सगळं घडण्यामागे खुद्द भारतीय जनता पक्षाचा हात होता असं म्हटलं जात आहे.
त्यांनी केलेल्या या कृतीचा काँग्रेसतर्फे निषेध करण्यात येत आहे. हा विश्वासघात असल्याची टीका स्वतः काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील केली आहे. आता त्यावर या दोघांवर पक्षांतर्गत कारवाई देखील करण्यात येऊ शकते.
मात्र या सगळ्यांमध्ये सत्यजित तांबे यांचा जुना फोटो व्हायरल होत आहे. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असताना सत्यजित तांबे यांनी केलेल्या महागाई बेरोजगारी विरोधातल्या आंदोलनामध्ये सत्यजित तांबे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोस्टरवर काळ फासल होत. हा फोटो सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. अशावेळी ज्या व्यक्तीने मोदींच्या चेहऱ्याला काळ फासलं त्या व्यक्तीला भाजपा पाठिंबा देणार का? असा प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित केला जात आहे