जळगाव लाईव्ह न्यूज । चिन्मय जगताप । सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरू आहे ती म्हणजे मोठमोठे उद्योग महाराष्ट्रातून बाहेर जाण्याची. मात्र महाराष्ट्रातून बाहेर जाणारे उद्योग हे महाराष्ट्रासाठी एक चुकीची बाब किंबहुना वाईट बाब आहे यात शंका नाही. मात्र गेल्या 25 वर्षात जळगाव जिल्ह्यात किती उद्योग आले? असा प्रश्न जर सर्वसामान्य नागरिकांनी जिल्ह्यातील बड्या नेत्यांना विचारला तर? यामुळे महाराष्ट्रासाठी भांडणारे जिल्ह्यातले नेते किंबहुना महाराष्ट्र राज्य सरकारची बाजू घेणारे जिल्ह्यातले नेते, जिल्ह्यासाठी गेल्या 25 वर्षात कोणताही रोजगार का आणू शकले नाहीत? इतर वेळी केवळ आणि केवळ राजकीय दृष्टीने सरकारवर टीका करणारे किंबहुना सरकारचे समर्थन करणारे जळगाव जिल्ह्यातले नेते जळगाव जिल्ह्याला इतकं सावत्र असल्याची वागणूक का देत आहेत?
बघायला गेलो तर जळगाव जिल्ह्यामध्ये सध्या तीन ते चार मोठे उद्योजक आहेत. या तीन ते चार मोठ्या उद्योजकांभोवती जळगावच औद्योगिक विश्व फिरत आहे. सध्या जळगाव मध्ये राहणारा तरुण मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक शहरांकडे ओढला जात आहे. त्याचे कारण म्हणजे जळगाव जिल्ह्यात नसलेले मोठे उद्योग आणि जे उद्योग आहेत त्या उद्योग समूहामध्ये असलेले कमी पगार.
जळगाव जिल्ह्यात गेल्या पाच वर्षापासून जे राजकारण सुरू आहे त्या राजकारणाला शुद्ध शब्दांमध्ये फक्त आणि फक्त ‘तू तू मै मै’ म्हणता येईल. जिल्ह्यातील एका नेत्याला असे वाटत आहे की जिल्ह्यामध्ये त्यांनी पक्ष वाढवला मात्र त्याच्यावर अन्याय झाला म्हणून त्यांनी पक्ष त्याग केला आणि दुसऱ्या नेत्याला वाटत आहे की जिल्ह्यामध्ये पक्षाने त्याला वाढवलं. ह्या छोट्याशा वादामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर या दोन नेत्यांची चर्चा होताना आपण बघत आहोत. मात्र या दोन नेत्यांच्या तोंडी जळगाव जिल्ह्याच्या रोजगाराबद्दल किंबहुना जळगाव जिल्ह्यामध्ये उद्योग कसे येतील याबाबत एक शब्दही निघालेला नागरिकांना आठवणार नाही. जितका वेळ जिल्ह्यातील हे नेते ‘तू तू मै मै’ करण्यात घालवतात इतका वेळ जर जळगाव शहराच्या किंबहुना जळगाव जिल्ह्याच्या प्रगतीसाठी एकत्र येऊन घालवला तर नक्कीच जळगाव जिल्ह्यामध्ये चांगले उद्योग येतील असा विश्वास जळगाव जिल्ह्यातील नागरिकांना आहे. मात्र यांना शहाणपण येईल असे वाटत नाही.
जळगाव जिल्ह्यातील एक नेते स्वतःला मी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार होतो. मात्र मला हे पद मिळालं नाही. असा म्हणतात. यामुळे ते नाराज झाले असं म्हणल जात आहेत. मात्र जर नीट विचार केला तर मुख्यमंत्रीपदाचा कॅलिबर असलेल्या या नेत्याने जळगाव जिल्ह्यासाठी नक्की किती रोजगार आणला? ज्या माणसाचं महाराष्ट्रावर इतकं वजन होतं. जो माणूस महाराष्ट्राच्या विधानसभेचा विरोधी पक्ष नेता होता. अशा नेत्याने जळगाव जिल्ह्यासाठी नक्की किती रोजगार आणून दाखलवा?
तर दुसरीकडे दुसरा नेता स्वतःला मुख्यमंत्र्यांचा राईट हॅन्ड म्हणून भूषवतो मात्र या नेत्याने देखील जळगाव जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांचा राईट हॅन्ड असताना नक्की किती उद्योग आणले? अजूनही ते मुख्यमंत्र्यांचे राईट हॅन्डच आहेत मात्र आजही समोरच्या नेत्यावर टीका करतात. समोरच्या नेत्याशी तू तू मै मै’ करतात सरकारची बाजू घेतात. मात्र जळगाव जिल्ह्यासाठी नक्की किती रोजगार या नेत्याने आणला?
गेल्या अडीच वर्षापासून आतापर्यंत जळगाव जिल्ह्याचा अजून एक नेता हा जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. मात्र पालकमंत्री असताना या नेत्याने गेल्या काही वर्षात जळगाव जिल्ह्यात रोजगार यावा यासाठी किती प्रयत्न केले? इतर वेळी विरोधकांवर केवळ आणि केवळ राजकीय टिप्पणी करण्या व्यतिरिक्त जळगाव जिल्ह्यामध्ये रोजगार यावा यासाठी या नेत्याने किती प्रयत्न केले? आजही जिल्ह्यामध्ये मी पक्ष वाढवला हे सांगण्या व्यतिरिक्त हा नेता जिल्ह्यामध्ये मी रोजगार आणिन असं म्हणतो आहे का? याचबरोबर महाराष्ट्राचा जाणता राजा असं ज्या नेत्याला म्हणतात, या नेत्यासोबत सत्तेत असताना जळगाव जिल्ह्यातील तत्कालीन पालकमंत्र्यांनी जळगाव जिल्ह्यासाठी किती रोजगार आणायचा प्रयत्न केला?
जळगाव एमआयडीसी मधील 40% व्यवसाय हे बंद पडले आहेत असे म्हटले जात आहे. सुरू असलेल्या 60% पैकी निम्मे व्यवसाय अडचणीत आहेत असे म्हटले जात आहे. कोणतीही सुरक्षितता जिल्ह्यातील एमआयडीसीमध्ये नाहीये. यामुळे इथून रोजगार हलवायचा आणि कुठेतरी चांगल्या ठिकाणी जाऊन यायचा असं उद्योजकांना वाटत आहे. विचार केला तर असलेला उद्योगही जळगाव जिल्ह्यातून जाऊ पाहतो आहे. अशावेळी जळगाव जिल्ह्यातील नेते अजूनही राजकारणातच व्यस्त आहेत . महाराष्ट्रातून उद्योग गेला असे बोंबा मारणारे आणि महाराष्ट्रातून उद्योग गेला नाही तो समोरच्यांनी घालवला अश्या मोठ्या मोठ्या बाता मारणारे जळगाव जिल्ह्याचे नेते अजून किती दिवस अशाच बाता मारतील आणि किती दिवस नागरिक अशा घाणेरड्या राजकारणाला सहन करतील? हा देखील प्रश्न उपस्थित होत आहे.