⁠ 
शनिवार, एप्रिल 13, 2024

विद्यापीठ सिनेट निवडणुकीत बाजी कोण मारणार?

जळगाव लाईव्ह न्यूज : २७ जानेवारी २०२३ : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या रविवार २९ जानेवारी रोजी होऊ घातलेल्या पदवीधर अधिसभा (सिनेट) निवडणुकीत रंगत आली आहे. विद्यापीठ विकास मंच विरुध्द विद्यापीठ विकास आघाडी अशी निवडणूक असली तरी विद्यापीठ विकास मंच विरुध्द विष्णू भंगाळे असेच चित्र निर्माण झाले आहे. यामुळे विद्यापीठ सिनेट निवडणुकीत कोण बाजी मारणार? याची उत्सुकता ताणली गेली आहे.

दोन्ही बाजूंकडील जमेच्या बाजू
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुरस्कृत विद्यापीठ विकास मंच सन २०११ चा अपवाद वगळता सातत्याने विद्यापीठ सत्तेत राहिली आहे. विद्यापीठाला सर्व लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून निधी आणणे, सातत्याने नवनविन उपक्रम राबविण्यात अग्रभागी राहिली आहे. अश्वमेध क्रीडा स्पर्धा, युवारंग महोत्सव, विद्यापीठ लायब्ररी उभारण्यात योगदान आहे. भाजप, संघ परिवार, संघटनेची ताकद, ३ जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचे नेटवर्क या जमेच्या बाजू आहेत.

दुसरीकडे विद्यापीठ विकास आघाडीचा चेहरा असलेले विष्णु भंगाळे सातत्याने २२ वर्षापासून निवडून येणारे सदस्य आहेत. जळगाव शहरात व भुसावळ परिसरात भंगाळे यांचा मित्र परिवार ही सर्वात मोठी जमेची बाजू आहे. महत्त्वाचे म्हणजे, विष्णू भंगाळे यांनी एक वर्ष आधीच नाव नोंदणी सुरु केली. जातीच्या आधारावरील मतदारांची मांडणी हि भंगाळे यांची बाजू मानली जाते. मात्र त्यांना प्रथम पसंतीचे मत दिल्यानंतर त्यांच्या पॅनलमधील उमेदवारांना किती मते वळवता येतील? हा मोठा प्रश्‍न आहे.

विद्यापीठ विकास आघाडीची ही ठरतेयं डोकदूखी
विद्यापीठ विकास आघाडी स्थापन केली असली तरी इतर पक्षीय नेते, कार्यकर्ते यांचा पहावा तसा सहभाग नाही. अनेक मोठे नेतेही निवडणुकीपासून लांब आहेत. यंदाच्या निवडणुकीत १० उमेदवार उभे केले त्यातील श्री नरेंद्रकुमार बोरसे यांना खुला व ईतर मागास प्रवर्गातून उमेदवारी म्हटली आहे पण नक्की कोणत्या प्रवर्गात मत द्यावे या बद्दल स्पष्टता नाही. वंचित बहुजन आघाडी म्हणून वैभव शिरतुरे व ज्योती कठारे यांनी उमेदवारी दाखल केलेली आहे पण पहावी तशी नोदणी नाही. अनेकांचा भर केवळ सोशल मीडियावरच दिसून येत आहे.

हे आहेत उमेदवार
विद्यापीठ विकास मंचच्या पॅनल मध्ये खुल्या गटातून अमोल नाना पाटील, अमोल मराठे, निलेश झोपे, सुनील निकम, अमोल सोनवणे, ओबीसीमधून नितीन झाल्टे, एससीमधून दिनेश खरात, एसटीमधून नितीन ठाकूर, एनटी दिनेश चव्हाण तर महिला राखीव मधून स्वप्नाली महाजन रिंगणात आहेत.
विद्यापीठ विकास आघाडीतर्फे खुल्या गटातून विष्णू भंगाळे, योगेश भावसार, नरेंद्रकुमार बोरसे, अंकित कासार, पंकज पाटील, एससी मधील नागसेन पेंढारकर, एसटीमधून भिमसिंग वळवी, ओबीसीमधून नरेंद्रकुमार बोरसे, एनटीमधून नितिन नाईक तर महिला राखीव मधून वंदना पाटील रिंगणात आहेत.