⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

जळगावातील केळी उत्पादकांच्या समस्या कोण सोडविणार?

जळगाव : केळीच्या उत्पन्नात भारताचा दुसरा क्रमांक लागतो. केळीच्या जागतिक उत्पादनाच्या सुमारे २४.१८ टक्के उत्पादन भारतात घेतले जाते. भारतात अंदाजे २ लाख २० हजार हेक्टर क्षेत्र केळीच्या लागवडीखाली आहे. भारतातील एकूण केळी पिकाखालील २३ टक्के क्षेत्र महाराष्ट्रात आहे. राज्यात ७२ हजार हेक्टर क्षेत्र केळी लागवडीखाली आहे. त्यापैकी सुमारे ४५ ते ५० हेक्टर क्षेत्र एकट्या जळगाव जिल्ह्यातच आहे. म्हणून जळगाव जिल्हाला केळीचे आगार मानले जाते. जळगाव जिल्हा हा केळी उत्पादन करणारा जिल्हा म्हणून राज्यात लौकीक असून येथील केळीचा रंग आकार आणि चव पाहता येथील केळी ही निर्यातक्षम असल्याचे नेहमीच म्हटले जाते. जळगावच्या जैन इरिगेशच्या माध्यमातून टिश्यू कल्चर प्रणालीची केळीची रोपे केळी उत्पादकांना सहज उपलब्ध होत असल्याने केळी उत्पादन वाढण्यासाठी मोठी मदत होत आहे.

जळगाव जिल्ह्यातून उत्तर प्रदेश, दिल्ली पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश या राज्यासह सौदी अरेबिया, इराण, कुवेत, दुबई, जपान व युरोपमधील बाजारपेठेत केळी निर्यात केली जाते. मागील पाच-सात वर्षांपासून खान्देशी केळीला पाकिस्तानात चांगली बाजारपेठ मिळाली आहे. गेल्या दोन- तीन वर्षांत अरब राष्ट्रांत जिल्ह्यातील केळी निर्यात होत आहे. इराक, इराण, दुबई, अफगाणिस्तान आदी देशांत ही निर्यात समुद्रमार्गे होत आहे. जिल्ह्यातून सुमारे १२ ते १५ निर्यातदार कंपन्या सरासरी ६०० कंटेनर केळी निर्यात करतात.एका कंटेनरमध्ये २०० क्विंटल म्हणजे २० टन केळी निर्यात होते. कंटेनर वातानुकूलित असतात. केळीची काळजीपूर्वक हाताळणी करून बॉक्समध्ये केळी भरून निर्यात होते. गेल्या वर्षी जिल्ह्यातील सुमारे सहाशे कंटेनर म्हणजे १५ कोटी रुपयांची बारा हजार टन केळी निर्यात झाली आहे.

रावेर तालुक्यातील तांदलवाडी, ऐनपूर, निंबोल, विटवा, केर्‍हाळे, मस्कावद, वाघोदा, अजनाड, अटवाडे, चोरवड, नेहता, दोधा, निरुळ, खानापूर या तापी पट्ट्यातील शेतकर्‍यांसह यावल तालुक्यातील सांगवी बुद्रुक, भालोद, साकळी या शिवाय चोपडा, जळगाव, जामनेर, पाचोरा, भडगाव ताालुक्यांमध्येही केळीचे उत्पादन घेतले जाते. केंद्र सरकारच्या अपेडा या संस्थेच्या सहकार्याने जळगाव जिल्ह्यात केळी निर्यात सुविधा केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. राज्याचा विचार केल्यास जळगावनंतर केळी निर्यात क्षेत्रांतर्गत धुळे, नांदेड, धुळे, हिंगोली, नंदुरबार, बुलडाणा, वर्धा आणि परभणी आदी केळी उत्पादक जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. या निर्यात क्षेत्रात सुविधा उभारणीच्या अंमलबजावणीसाठी राज्य कृषी पणन मंडलाची ‘नोडल एजन्सी’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

केळीचा वापार बहुपर्यायी

केळीच्या ८६ टक्केहून अधिक उपयोग खाण्याकरीता होतो. त्यापाठोपाठ कच्च्या केळीपासून वेफर्स, पीठ, मुरब्बा. जेली किंवा टॉफी आदी पदार्थ तयार केले जातात. ज्यांना खूप मागणी असते. केळीचे अन्य उपयोग देखील होतात. जसे की, केळीच्या पानांचा वापर जेवणावेळी केला जातो. केळफुलांची भाजी केली जाते. केळीच्या पीठापासून भाकरी केल्या जातात. केळीच्या पानांवर जेवणे हे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशिर असल्याचे आता वैज्ञानिक दृष्ट्या सिध्द झाले आहे. केळीच्या झाडाचा धार्मिक कार्यात मंगलचिन्ह म्हणून उपयोग केला जातो. याशिवाय केळीच्या खोडाची व कंदाचे तुकडे करुन ते जनावरांचा चारा म्हणून उपयोग केला जातो. केळीपासून वाईन तयार करण्याच्या प्रक्रियेवर देखील काम सुरु आहे.

केळी उत्पादक शेतकर्‍यांच्या समस्या

उत्पादनात भारताला जागतिक पातळीवर प्रथम स्थान मिळवून देण्यात मोठा वाटा उचलणारा जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी गेल्या काही महिन्यांपासून कमालीचा अडचणीत सापडला आहे. गारपीट, चक्रीवादळ, अवकाळी पाऊस, कडक उन्हाळा अशा नैसर्गिक संकटांना तोंड देतांना रोगराई व बाजारपेठेतील चढउतारांना सामोरे जावे लागते. मध्यंतरी केळी वाहतूकीसाठी वातानुकुलित वॅगन उपलब्ध नसल्याने केळी उत्पादक शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सर्वात मोठी समस्या म्हणजे बाजारपेठेतील चढउतार! अशा अनेक समस्यांचा सामना करत जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी शेतात राबत असतो. राज्य व केंद्र सरकारने राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून केळी उत्पादक शेतकर्‍यांच्या समस्यांकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.