⁠ 
रविवार, सप्टेंबर 8, 2024
Home | जळगाव जिल्हा | चिमुकल्यांच्या अपघाती मृत्यूला दोषी कोण?

चिमुकल्यांच्या अपघाती मृत्यूला दोषी कोण?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । गेल्या दोन दिवसात दोन अत्यंत वाईट घटना कानावर आल्या आणि मन सुन्न झाले. वेगवेगळ्या घटनेत दोन चिमुकल्यांना जग पाहण्याअगोदरच जगाचा निरोप घ्यावा लागला. घटनेनंतर सोशल मीडियावर उमटलेल्या प्रतिक्रियांनी तर मन आणखीनच हेलावले आणि संताप उमटला. अनेकांनी घटनेसाठी बाळाच्या आईलाच दोषी ठरवले. मुळात प्रश्न असा आहे की, चिमुकल्यांना कळत नसलेल्या वयात ते क्षणात इकडे-तिकडे झडप घालतात आणि नको त्या संकटात सापडतात त्यात आईच जबाबदार कशी? आपल्या काळजाचा तुकडा जगातून निघून जावा असे कोणत्याच आईला वाटत नाही. घटनेला कुटुंबातील सदस्य देखील तेवढेच जबाबदार असतात. आजकाल सतर्कता आणि चाणाक्षपणाचा आपल्याला आणि कुटुंबाला सुरक्षित ठेवू शकतो.

धरणगाव तालुक्यातील पिंप्री खुर्द येथे बहिणीसोबत खेळत असताना अडीच वर्षीय रोहन धोबी हा चिमुरडा उकळत्या दुधात पडल्याची घटना १३ ऑक्टोबरला घडली होती. दुर्दैवाने या बालकाचा उपचारादरम्यान मुंबईतील रुग्णालयात २४ ऑक्टोबरला मृत्यू झाला. तर दुसरीकडे एका चिमुकल्याचा झोक्यात दोराचा फास लागून मृत्यू झाला. २६ ऑगस्ट रोजी देखील यावल तालुक्यातील भालशिव या गावात झोपडीत बांधलेल्या झोक्यातून पडल्याने राशी या १ वर्षीय चिमुकलीचा डोक्यास गंभीर दुखापत होऊन उपचार सुरू असताना तिचा दुदैवी मृत्यू झाला होता.

लहान मुले निरागस आणि सोज्वळ असतात. जगाचा अनुभव त्यांच्यासाठी नवीन असल्याने जसजसे वय वाढते तसे ते काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करीत असतात. आपल्या समोर आणि आजूबाजूला असलेली कोणती वस्तू, गोष्ट, व्यक्ती चांगला-वाईट, फायदेशीर-धोकादायक हे त्यांना काहीच कळत नाही. चिमुकल्यांच्या नवनवीन कला आणि हालचाली कुटुंबातील वातावरण प्रसन्नित ठेवतात. जन्माला आल्यानंतर विशेषतः बाळ रांगायला लागल्यावर आणि चालायला लागल्यावर त्यांच्याकडे विशेष लक्ष द्यावे लागते. पालकांची नजर हटताच ते दुसरीकडे पळ काढतात.

जिल्ह्यात गेल्या काही दिवसात झालेल्या घटनेनंतर सोशल मिडियात अनेकांनी सांत्वन केले, श्रद्धांजली अर्पण केली आणि सोबतच अनेकांनी पालकांना व विशेषतः चिमुकल्यांच्या आईला दोष दिला. घरातील कामे करताना आई आपल्या चिमुकल्याकडेच लक्ष ठेवून असते पण सोबतच सांसारिक कामांची पूर्तता करणे देखील तिला क्रमप्राप्त असते. काही महिन्यांपूर्वी एक फोटो सोशल मिडियात व्हायरल झाला होता. एका आईने प्रातविधी करण्यासाठी गेल्यानंतर देखील बाळाकडे लक्ष रहावे म्हणून दरवाजा काहीसा उघडा ठेवला होता. अनेकांनी त्या महिलेवर टीका केली तरी कितीतरी जणांनी तिचे समर्थन देखील केले. बाळाला सांभाळणे किती अवघड असते हे फक्त आईच ओळखू शकते.

दर मिनिटाला बाळाचा स्वभाव, वागणे आणि विचार बदलत असतो. आपल्या अनंत अडचणी असल्या तरी त्याची झळ बाळाला न पोहचू देता आई-वडील रात्रीचा दिवस करून त्याची काळजी घेत असतात. तळहाताच्या फोडाप्रमाणे बाळाला जपावे लागते. आपल्या काळजाचा तुकडा कसा आहे आणि काय करतोय हे पाहण्यासाठी आई मिनिटामिनिटाला येऊन पाहत असते. एकवेळ गॅसवर तापवायला ठेवलेले दूध उतू गेले, भाजी जळाली तरी चालेल पण आपल्या चिमुकल्याला काही त्रास तर नाही ना याचाच विचार आई करीत असते. कुटुंबात जवळपास सर्वांनाच घरातील लहान बाळ आवडते आणि हवेहवेसे असतात. क्वचितच काही ठिकाणी मुलगी असल्यास तिरस्कार केला जातो.

सोशल मिडियात आईच्या किंवा पालकांच्या नावे दोष देणाऱ्यांना किंबहुना बाळ नसावे किंवा त्यांनी बाळाला सांभाळण्याची जबाबदारी पार पाडली नसावी असेच वाटते. उचलली जीभ आणि लावली टाळूला अशी परिस्थिती सोशल मिडियात कमेंट करणाऱ्यांची वाटते. आपल्या बाळाची काळजी घेणे हि पालकांचीच जबाबदारी असते आणि ते त्या जबाबदारीपासून लांब पळू शकत नाही हे तितकेच खरे असल्याने घरातील एखादे काम कमी किंवा उशिरा झाले तर चालेल पण आपणच त्यांच्यावर लक्ष ठेवणे किंवा त्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. शुक्रवारी उघड झालेल्या एका घटनेत चुलत काकाने शुल्लक कारणावरून दोन चिमुकल्यांचा जीव घेतला. आजच्या कलियुगात केव्हा कोण काय करेल याचा भरवसा नसल्याने कुणावरही डोळे झाकून विश्वास ठेवण्यापेक्षा आपण अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे.

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.