जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात लाचखोरीचे प्रमाण वाढताना दिसत असून अशातच आता आणखी एका लाचेची बातमी समोर आलीय. ज्यात ३ हजार रुपयांची लाच घेताना तलाठ्यास जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कुसूंबा येथे आज मंगळवारी रंगेहाथ अटक केली आहे. नितीन शेषराव भोई (वय ३१ वर्षे) असं लाचखोर तलाठ्याचं नाव असून याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
नेमका प्रकार काय?
२६ वर्षीय तक्रारदार यांनी त्यांचे आई व भावाचे नाव सातबारा उताऱ्यावर व स्लॅब रजिस्टरवर नाव लावण्यासाठी अर्ज केला होता. त्याबाबत तलाठी नितीन शेषराव भोई यांनी ५ हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्याबाबत तक्रारदार यांनी आज दि. ७ जानेवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगांव यांना तक्रार दिली होती. सदर तक्रारीची पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता तलाठी नितीन भोई यांनी सातबारा उताऱ्यावर व स्लॅब रजिस्टरवर नाव लावण्यासाठी प्रथम ५ हजार,नंतर ४ हजार रुपये व तडजोडअंती ३ हजार रुपयाची लाचेची मागणी केली.
यावेळी तलाठी नितीन भोई आज दि. ७ जानेवारी रोजी ३ हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले असून त्यांचेवर एमआयडीसी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. सदरची कारवाई हि पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, फौजदार सुरेश पाटील, पोना बाळू मराठे, पोकॉ अमोल सूर्यवंशी यांनी केली आहे. या कारवाईमुळे कुसूंबा गावात खळबळ उडाली आहे.