⁠ 

जळगाव जिल्ह्याची स्थापना कधी झाली ? वाचा गौरवशाली इतिहास

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | २१ ऑक्टोबर २०२३ | आज आपल्या जळगाव जिल्ह्याचा वर्धापन दिन आहे. होय तुम्ही जे वाचतायं ते खरं आहे. आजच्या दिवशीच जळगाव जिल्ह्याची निर्मिती झाली आहे. यामागे अत्यंत गौरवशाली इतिहास आहे. अगदी सातवहन राज्य, महाभारतापासून अल्लाउद्दीन खिलजी व ब्रिटिशांशी याचा थेट संबंध येतो. आपल्या जळगाव जिल्ह्याच्या गौरवशाली इतिहासाची पाने आज आपण उलगडून पहणार आहोत.

खान्देश म्हणून ओळखल्या जाणार्‍या आत्ताच्या जळगाव जिल्ह्याने सातवाहनांपासून, मराठे व त्यांनतर इंग्रजांपर्यंत अनेक राजवटी पाहिल्या. खान्देश हे नाव कसे पडले? याबाबत मतमतांतरे आहे. काही इतिहासकारांच्या मते इथे मुसलमानी राजवट असताना खान ह्या पदवीमुळे ह्या प्रांताला खानदेश म्हणतात. तर महाभारतात असलेल्या उल्लेखाप्रमाणे खांडववन हा प्रांत होता ज्याचा अपभ्रंश खान्देश झाला. ह्या नावामागे अजून एक कथा अशी आहे की भगवान कृष्णाच्या नावामुळे ह्याला कान्हादेश किंवा कान्हदेश असे म्हटले जात असे. पुढे त्याचा अपभ्रंश होवून खान्देश हे नाव रुढ झाले.

हा भाग अत्यंत समृद्ध असल्याने इथे अनेकांनी राज्य केले. येथे सातवाहनांनी राज्य केले. हे सातवाहन अत्यंत पराक्रमी होते. ह्यांच्या नंतर चालुक्य आणि मग यादव अशी घराणी इथे राज्य करू लागली. अल्लाउद्दीन खिलजीने देखील हा प्रांत काबीज केला होता. आणि तेव्हा पासून मुसलमानी आक्रमणे जळगाववर होत गेली. नंतर हा प्रांत निजामाच्या हाती होता. त्यानंतर मात्र मराठ्यांचे राज्य आले व जळगाव मराठ्यांकडे गेले. मराठ्यांकडून बिटिशांकडे हा भाग आला.

सध्याचा जळगाव जिल्हा हा दहाव्या आणि अकराव्या शतकात यादव साम्राज्याच्या सेउना-देसाचा एक भाग होता. १७९५ मध्ये खर्ड्याच्या लढाईनंतर, हैदराबादच्या निजामाला खान्देश मराठ्यांच्या ताब्यात देण्यास भाग पाडले गेले. पेशव्यांना आणि सिंधियांना खान्देशचा काही भाग मिळाला आणि उर्वरित प्रदेशाचा बहुतांश भाग होळकरांना मिळाला. पेशव्याला दिलेला भाग त्याच्या स्वतःच्या सुभामध्ये विभागला गेला, ज्यात गौलाना, खान्देश, मेईवार, बजागूर, पल्लनेमौर आणि हिंदिया यांचा समावेश होता. तिसर्‍या इंग्रज-मराठा युद्धानंतर इंग्रजांना या प्रदेशाचा अधिकार मिळाला.

१९०६ पूर्वी इंग्रजाच्या राज्यात जळगाव जिल्ह्याचे नाव खान्देश जिल्हा होते. खान्देश जिल्हा वर्तमान जळगाव जिल्हा, धुळे जिल्हा, नंदुरबार जिल्हा आणि नाशिक जिल्ह्याचा काही भाग मिळून बनलेला होता आणि धुळे शहर हे खान्देश जिल्हाचे मुख्यालय होते. आजचे जळगाव हे पूर्वी 19 व्या शतकात म्हणजे 1862 सालापर्यत खान्देश (धुळे) जिल्हातील नशिराबाद तालुक्यातील जळगाव बु।।. म्हणून ओळखले जाणारे छोटेसे गांव होते.

जळगांवचा कापूस इंग्लंडमध्ये पाठविण्याच्या हेतूने इंग्रजांनी 1852 साली ठाणे ते भुसावळ रेल्वेमार्ग निर्माण केला. या रेल्वेमार्गावर जळगांवचे स्थान आल्याने खऱ्या अर्थाने जळगांवचे भाग्य बदलले व जळगांवच्या विकासास चालना मिळाली. जिल्हाचे व तालुक्याचे मुख्यालय नशिराबादहून जळगांवी आले. 1862 साली जळगांव नगरपालिकेची स्थापना झाली. तेथून जळगावच्या विकासाला सुरुवात झाली.

१९०६ला खान्देश जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले आणि पूर्व खान्देश व पश्चिम खान्देश असे दोन नवीन जिल्हे बनवले गेले. पूर्व खान्देश मध्ये आताचा जळगाव जिल्हा होता तर पश्चिम खान्देश मध्ये आता अस्तित्वात असलेले धुळे आणि नंदुरबार जिल्हे होते. भारतातील राज्यांच्या १९५६ च्या पुनर्रचनेदरम्यान पूर्व खान्देश बॉम्बे राज्यात सामील झाला. ते चार वर्षांनंतर, १९६० मध्ये, महाराष्ट्र या नव्याने निर्माण झालेल्या राज्यात सामील झाले. त्यानंतर २१ ऑक्टोबर १९६० रोजी पूर्व खान्देशचे नामकरण जळगाव जिल्हा असे करण्यात आले.