जळगाव लाईव्ह न्यूज । २० जानेवारी २०२२ । गेल्या काही वर्षांपासून राज्यभर गाजत असलेल्या बीएचआर पतसंस्था आर्थिक घोटाळ्याचे कामकाज जिल्हा न्यायालयात सुरु आहे. बुधवारी खटल्यात १०२ वर्षांच्या आजोबांची साक्ष नोंदविण्यात आली. तब्बल २५ मिनिटे स्पष्टपणे बोलत त्यांनी न्यायालयाला आपबिती कथन केली. तीन लाख रुपयांच्या ठेवीची रक्कम परत न मिळाल्याने झालेली त्यांची फरपट न्यायालयाने नोंदवून घेतली. बहुधा राज्यातील न्यायालयात एवढ्या वयोवृद्ध व्यक्तीने न्यायालयात हजर राहून साक्ष दिल्याचे हे कदाचित पहिलेच प्रकरण असू शकते, असा दावाही करण्यात येताे आहे.
मुरलीधर रामचंद्र वाघ (रा.चांदवड) असे या वयोवृद्धाचे नाव आहे. शेतीत राबून कमावलेले पैसे त्यांनी बीएचआरच्या चांदवड (जि.नाशिक) शाखेत दाेन वेळा करून तीन लाख रुपये ठेवले होते. पैसे परत मिळवण्यासाठी त्यांची प्रचंड फरपट झाली; परंतु बँकेत पैसेच शिल्लक नाहीत असे उत्तर त्यांना वेळोवेळी मिळाले. बीएचआर प्रकरणात जळगावच्या रामानंदनगर पोलिस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला. याच गुन्ह्यात तत्कालीन पोलिस निरीक्षक अशोक सादरे यांनी सर्व संचालकांना अटक केली. यानंतर राज्यातील अमरावती, परभणी, लातूर, सांगली, पुणे अशा विविध शहरात एकूण ८२ गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. या सर्व गुन्ह्यांची एकत्रित सुनावणी जिल्हा न्यायालयात सुरू करण्यात आली असून जिल्हा सरकारी वकील ऍड.केतन ढाके हे कामकाज पाहत आहेत.
‘हे’ संचालक आहेत कारागृहात
बीएचआर प्रकरणात संचालक प्रमोद भाईचंद रायसोनी, दिलीप कांतिलाल चोरडिया, मोतीलाल ओंकार जिरी सूरजमल बघुतमल जैन, दादा रामचंद्र पाटील, भागवत संपत माळी, राजाराम काशिनाथ कोळी, हिरामण वाघ, डॉ. हितेंद्र यशवंत महाजन, इंद्रकुमार आत्माराम ललवाणी, शेख रमजान शेख अब्दुल नबी मन्यार, सुकलाल शहादू माळी, यशवंत आकार जिरी, लीलाबाई राजाराम सोनवणे, प्रमिलाबाई मोतीलाल जिरी हे संचालक कारागृहात आहेत. तर मधुकर विष्णू सानप हे मृत झाले आहेत.
मी मुरलीधर रामचंद्र वाघ…
मुरलीधर वाघ यांची साक्ष होणार असल्याचे समन्स त्यांना काही दिवसांपूर्वीच मिळाले होते. वयोवृद्ध असल्यामुळे ते न्यायालयात हजर राहतील की नाही? हा प्रश्न सरकारी वकील केतन ढाके यांना पडला होता. पण मिळेल त्या वाहनाने प्रवास करून वाघ वेळेवर न्यायालयात हजर झाले. न्यायाधीश आर. एन. हिवसे यांच्या न्यायालयात त्यांच्या नावाचा पुकारा होताच हातात काठी टेकत एका मुलाचा आधार घेत न्यायालयाच्या खोलीत आले. त्यांना पाहून सारेच अवाक् झाले. सर्वत्र शांतता पसरली. यानंतर वाघ बोलले, मी मुरलीधर रामचंद्र वाघ, माझा शेतीचा व्यवसाय आहे. भाईचंद हिराचंद्र रायसोनी मल्टी स्टेट को-ऑप. क्रेडिट मोटी लि., शाखा चांदवड, येथे माहितीपत्रक व लोकांकडून माहितीनुसार, प्रत्येक ठेवीवर पैसे गुंतवणूक करीत होते. त्यामुळे मी सदर पतसंस्थेमध्ये संजीवनी ठेव योजनेत एक लाख, दोन लाख अशी एकूण तीन लाखांच्या ठेवी ठेवल्या होत्या. मुदत पूर्ण झाल्यानंतर मी पैसे परत घेण्यासाठी गेलो असता मला संबंधित लोकांनी टाळटाळ केली. बँकेत पैसेच नाहीत, तुम्हाला कोठून देऊ असे उत्तरे मिळू लागली. यानंतर शाखाच बंद झाली. अखेर मी नाराज होऊन माघारी परतलाे. पैसे मिळणार नाहीत असे मला वाटले. यानंतर राज्यभरात गुन्हे दाखल झाले. मला जळगावात साक्षीला यायचे असल्याचा निरोप मिळाला. मी बीएचआरमधील त्या वेळेच्या लोकांना ओळखू शकतो असे त्यांनी आवर्जून सांगितले. वाघ यांची साक्ष पूर्ण झाली. वाघ यांनी सर्वप्रथम वयाच्या ९८व्या वर्षी जबाब नोंदवला होता. तरी न्यायालयाच्या समक्ष त्यांनी साक्ष नोंदवली. कष्ट करून जमा केलेले पैसे परत द्या, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केले.
हे देखील वाचा :
- साप पकडणे जीवावर बेतले; दंश केल्याने शेतमजुराचा मृत्यू
- निवडणूक ड्युटीवरून घरी परताना शिक्षकावर काळाचा घाला; अपघातात दुर्देवी मृत्यू
- Breaking : जळगावात निवडणूक कर्मचाऱ्यांच्या वाहनाला अपघात
- बहिणीच्या लग्नाच्या दिवशी भावाचा हृदयविकाराने मृत्यू ; यावल तालुक्यातील दुर्दैवी घटना
- धक्कादायक ! जळगाव शहरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबारीची घटना