⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | रावेर | मधुकरराव चौधरींचा केवढा दरारा होता, ना.पवारांचे आमदारांना चिमटे

मधुकरराव चौधरींचा केवढा दरारा होता, ना.पवारांचे आमदारांना चिमटे

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ डिसेंबर २०२१ । राज्याचे अधिवेशन सध्या चांगलेच गाजत असून बेशिस्त आमदारांचे कान टोचत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत माजी मंत्री स्व.मधुकरराव चौधरी यांचे उदाहरण देत चांगलेच चिमटे काढले. ना.पवार म्हणाले, आपण कसे वागतो याचं सदस्यांना जराही भान राहिलेलं नाही. सभागृहात येताना जाताना नमस्कार करायचा याचंही सदस्यांना भान राहिलं नाही. काही सदस्य तर एकदा निवेदन दिल्यानंतर पुन्हा दहा मिनिटाने निवेदन द्यायला येतात, असं सांगतानाच एक सदस्य तर थेट मुख्यमंत्र्यांच्याच खुर्चीवर येऊन बसला. शेवटी त्याला अरे बाबा, ही मुख्यमंत्र्यांची खुर्ची आहे. तेवढी तरी राहू दे असं म्हणण्याची वेळ आली, असं अजित पवार यांनी सांगितलं.

उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांनी आज विधानसभेत सांगितले की, सुरुवातीला मधुकरराव चौधरी अध्यक्ष असताना आम्ही आमदार होतो. तेव्हा केवढा दरारा असायचा. ते उभे असतील तर आम्ही क्रॉस करायचो नाही. आता तर आमच्या सीटवर कोणीही येऊन बसतो. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवरही येऊन बसतात. त्यांना म्हटलं तेवढी तरी राहू दे. तुला 145 आमदारांचा पाठिंबा मिळाला तर बस. पण सदस्य ऐकत नाही, असं पवार म्हणाले. सभागृहातील शिस्तीवरही त्यांनी भाष्य केलं. पूर्वी कॅबिनेटमंत्री पुढे बसायचे. आम्ही पाठी बसून त्यांच्याशी बोलायचो. त्यांना सभागृहात डिस्टर्ब करायचो नाही. आता एक पत्र दिल्यावर दहा मिनिटाने दुसरं पत्रं देतात. अरे एकदाच काय द्यायचं ते द्या ना बाबा. पण सर्वांनी शिस्त पाळा. क्रॉसिंग तर कुणाला कळत नाही. कोण कुठं उभं आहे… काय आहे… हेच माहीत नाही. कसंही क्रॉसिंग केलं जातं. तिथं तर बऱ्याचदा बोलत असतात. इथं कोणतरी बोलत असतात. अध्यक्षांकडे पाठ असते. अध्यक्षांना पाठ दाखवायची नसते. आल्यावर त्यांना नमस्कार करून बसायचे असते. जातानाही नमस्कार करायचा असतो एवढी साधी गोष्टही त्यांना कळत नाही, असंही ते म्हणाले.

ना.अजित पवारांनी आवाहन करताना सांगितले, विधीमंडळ सर्वोच्च असून इतक्या वर्षांच्या सभागृहाच्या प्रदिर्घ वाटचालीत विधीमंडळ सभागृहाने उच्च मूल्य प्रस्थापित केले आहेत. त्यामुळे प्रत्येक आमदाराने आदर्श आचारसंहितेचे पालन करत जबाबदारीने वागले पाहिजे. विधानसभेत आमदार निवडून आल्यानंतर तो सार्वजनिक जीवनात कसा वागतो? सभागृहात कसे वर्तन करतो? यावरुन त्याची प्रतिमा ठरत असते. काही सदस्यांच्या चुकीच्या वर्तणुकीमुळे सभागृहाच्या प्रतिमेला नक्कीच तडा गेला आहे‌. आता सर्वांनीच अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे, असे आवाहन ना.पवार यांनी केले.

हे देखील वाचा :

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.