जळगाव लाईव्ह न्यूज | १९ डिसेंबर २०२२ | ज्यांच्याकडे दुचाकी, चारचाकी किंवा अन्य वाहने आहेत त्यांच्यासाठी आरटीओ कार्यालयांमध्ये १४ प्रकारच्या फेसलेस सेवा दिल्या जात आहेत. असे आपण वाचले असेल. मात्र फेसलेस सुविधा म्हणजे काय? त्यांचा लाभ कसा घ्यावा? असे प्रश्न जर तुम्हाला पडले असतील तर याच अनुषंगाने आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. आधार क्रमांकाचा वापर करून १४ प्रकारच्या फेसलेस सेवेचा लाभ घेता येतो. यासाठी परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर आधारकार्ड नंबर टाकून माहिती व शुल्क भरून आरटीओच्या १४ फेसलेस सेवांचा लाभ घेता येतो.
लर्निंग लायसन्स परीक्षा, डुप्लिकेट आरसी, डुप्लिकेट लायसन्स, लायसन्स नूतनीकरण, एनओसी, आरसी किंवा लायसन्सवरील पत्ता बदल, कंडक्टर लायसन्सचे नूतनीकरण, वाहनाचे फिटनेस सर्टिफिकेट, वाहन हस्तांतरण, परमिट हस्तांतरण, विशेष परमिटसाठी अर्ज, परिवहन सेवेतील रेकॉर्डमध्ये मोबाइलचा नंबर नोंदविणे, कर्जबोजा रद्द करण्यासह आता वाहन ट्रान्सफर व तात्पुरती नोंदणी सेवांचा फेसलेस पध्दतीने अर्थात घरबसल्या लाभ घेता येवू शकतो.
या सेवांचा लाभ घेण्याकरिता अर्जदाराकडे आधारकार्ड व त्या आधारकार्डाशी मोबाईल नंबर जोडणी असणे आवश्यक आहे. आधार क्रमांकाशी जोडलेल्या मोबाईलवर ओटीपी पाठविण्यात येतो. या ओटीपीची नोंदणी परिवहन विभागाच्या संकेतस्थळामध्ये केलेल्या परवाना प्रमाणपत्रामधील अर्जदाराची माहिती व आधार अभिलेखातील अर्जदाराची माहिती याची खातरजमा झाल्यानंतरच अर्जदारास पुढे अर्ज करणे शक्य होणार आहे. या सेवांचा लाभ व अर्ज करण्यासाठी परिवहन विभागाच्या www.parivahan.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी.