जळगाव लाईव्ह न्यूज । २१ नोव्हेंबर २०२२ । भारतात यंदा हिवाळा सुरू झाला तरी अद्याप थंडी जाणवत नव्हती. उत्तर भारतात चार-पाच दिवसापूर्वी थंडीची लाट येताच जळगाव देखील गारवा जाणवू लागला होता. रविवारी रात्रीच्या सुमारास जळगावचा पारा अधिकच खाली आला असून ८.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तापमान कमी झाल्याचे परिणाम दिसू लागले असून उबदार कपडे परिधान करण्यास नागरिकांनी सुरुवात केली आहे.
ममुराबाद येथील शासकीय हवामान केंद्रावर ८.५ तापमानाची नोंद झाली आहे. हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टी सुरू असून हा त्याचा परिणाम असल्याचे तज्ञ सांगतात. कडाक्याच्या थंडीपासून बचावासाठी नागरिक स्वेटर, मफलर, हातमोजे, जॅकेट, उबदार कपड्यांचा वापर करीत आहेत. सोबतच ठिकठिकाणी शेकोट्या पेटवून ऊब मिळविण्याचा प्रयत्नही सुरू आहे. जळगाव जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून गारठा वाढला असून विशेषतः ग्रामीण भागात जास्त थंडी जाणवत आहे. रविवारी अधिकच थंडी असल्याने वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाला होता.
दुपारी कडक ऊन असूनही थंडी जाणवत होती. उन्हातही स्वेटरचा वापर करताना नागरिक दिसून आले. थंडीत व्यायाम केल्याने आरोग्य निरोगी राहाते. यामुळे लहानांपासूनच ज्येष्ठांपर्यंत सर्वच थंडीत व्यायाम करणे, सकाळी फिरायला जातात. गेल्या काही दिवसांपासून सकाळी पायी फिरणाऱ्यांची संख्या वाढली आहे.