जळगाव लाईव्ह न्यूज । २२ डिसेंबर २०२५ । गेल्या काही दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात थंडीची लाट पाहायला मिळत आहे. उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे तापमानाचा पारा घसरला आहे. रविवारी मात्र तापमानात एकाच दिवसात ३ अंशपर्यंत वाढ दिसून आली. शनिवारी ६ अंशावर असलेला जळगावचा पारा रविवारी ९ अंशावर पोहोचला. यामुळे थंडीपासून काहीसा दिलासा मिळाला असाल तरी येणाऱ्या तीन दिवसांत थंडी अधिक तीव्र होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

उत्तरेकडील शहरे गारठल्यानंतर त्या दिशेने १० ते १२ प्रतितास वेगाने येणाऱ्या थंड वाऱ्यांनी जळगाव शहर व जिल्हा शनिवारी गारठला होता. यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात नीचांकी म्हणजेच ६ अंश तापमानाची नोंद झाली. तर रविवारी पहाटे किमान तापमान नऊ अंशांवर पोहोचले. म्हणजेच एकाच दिवसात तीन अंशांनी किमान तापामान वाढले. दुसरीकडे कमाल तापमानात ०.६ अंशांनी घट होऊन तापमान २८.५ अंशांवर आले होते.

यापूर्वी १० जानेवारी २०२३ रोजी जळगावमध्ये पारा ५.२ अंशांपर्यंत घसरल्याची नोंद आहे. दरम्यान २४ डिसेंबरपर्यंत थंडी कायम राहण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.







